पुणे : महापालिकेत समाविष्ट केलेल्या ११ गावांमधील त्रस्त नागरिकांचा धडक मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १० रोजी महापालिका भवनावर नेण्यात येणार आहे.
लोहगांव आणि परिसरातील पाणी, सांडपाणी, कचरा, वीज आणि आरोग्य आदी प्रश्नांबाबत पुणे महापालिकेकडे अनेकवेळा निवेदने देण्यात आली, बैठका झाल्या पण काडीमात्र सुधारणा झाली नाही. सद्यस्थितीत लोहगांवकरांना १० दिवसांत एकदा पाणी मिळत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
हे देखील वाचा
पुणे महापालिकेत ११ गांवे समाविष्ट झाली पण, विकासकामांबाबत काहीच सुधारणा नाही. विविध करांपोटी पालिकेने या ११ गावांतून कोट्यावधी रुपये जमविले. उदाहरणच द्यावयाचे झाल्यास लोहगांवमधून एका वर्षात साडेनऊ कोटी रुपये जमा करुन घेतले पण, त्या प्रमाणात विकासकामांवर खर्च केला गेला नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. फक्त पैसे वसुलीसाठी ही गांवे समाविष्ट केली का? असा प्रश्न उपस्थित करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पालिका अंदाजपत्रकात ११ गावांसाठी स्वतंत्र तरतूद करावी अशी मागणी केली आहे.
मोर्चाच्या तयारीसाठी पक्षाची बैठक घेण्यात आली. यावेळी पालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, सचिन दोडके, पांडुरंग खेसे, काका चव्हाण, राजेंद्र खांदवे पाटील, सचिन घुले, संदीप तुपे, अनिता इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.