जळगाव । शहरातील सुप्रीम कॉलनीतील महानगरपालिकेची मराठी व उर्दू माध्यमाची शाळा क्र. 32 प्राथमिक सुविधांपासून वंचीत आहे. या शाळेची पहाणी भाजपाचे गटनेते सुनील माळी व नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी पहाणी करून समस्या समजावून घेतल्या. या शाळेत शौचालय असून ते बंद आहे. पिण्याचे पाणी नाही, नळ कनेक्शन नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शाळेच्या परिसरात आजुबाजुच्या गटारींचे पाणी शिरले असून यापाण्याचे डबके शाळा परिसरात साचले आहे. यामुळे डासांचा प्रर्दुभाव वाढला असल्याचे या पहाणीत आढळून आले असल्याची तक्रार आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
उघड्यावर बालवाडी वर्ग
या शाळेची संरक्षण भिंत तुटलेली आहे. गेट नाही, दरवाजे तुटलेले तर खिडक्यांना तावदाने नाही. शाळेला वॉचमन नसल्याने परिसरातील नागरिक शाळेची तोडफोड करीत असतात. शाळेत सफाईसाठी कर्मचारी 10 ते 12 दिवसांतून एकदाच येत असतात. बालवाडीसाठी वर्ग खोली नसल्याने उघड्यावर भरविली जाते. वर्ग खोल्यांची कमतरता असल्याने दोन वर्ग मिळून एकच वर्ग भरविण्यात येतो. यात 1ली व 2 री, 3री व 4थी, 5 वी व 6वी चे वर्ग एकत्र भरविण्यात येत असतात.
उर्दू माध्यमांचे वर्ग वाढवा
शाळेतील शिक्षक स्वतः दानशुर व्यक्तींना भेटून विद्यार्थ्यांसाठी गणवेश व बुट मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शाळेतील शिक्षक राहुल परदेशी यांना कन्यारत्न झाल्याने त्यांनी शाळेतील पहिल्या वर्गांतील 40 विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप केले. उर्दू माध्यमच्या शाळेत 8वी पर्यंत वर्ग आहेत. या उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शहरातील इतर उर्दू शाळांमध्ये प्रवेश मिळत नसल्याने शिक्षणापासून वंचीत रहावे लागते. यामुळ उर्दू माध्यमांत 8वीनंतरही पुढील वर्गांची सुरूवात करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निष्कृष्ट पोषण आहार
मनपा शाळा क्रमांक 32 मध्ये एकुण वर्गांपैकी इयत्ता 1ली व 2 री, 3री व 4थी, 5 वी व 6वी चे वर्ग एकत्र भरविण्यात येत असतात. शाळेत शिक्षकांची संख्या अपूर्ण आहे. विद्यार्थ्यांना दिला जाणारा नाश्ता हा निष्कृष्ट दर्जांचा असल्याचे आढळले. खिचडीमध्ये तूरडाळ नावालाच होती. टोमॅटो, कांदा यांचा लवलेशही नव्हता. मनपाच्या शाळांना विद्यार्थी मिळत नसल्याची ओरड एकीकडे असतांना या शाळेत मुलांची संख्या समाधानकारक असून उर्दू माध्यमात 530 तर मराठी माध्यमात 250 विद्यार्थीं शिक्षण घेत आहेत. तर सेमी इंग्लिश माध्यमाच्या बालवाडीत 130 विद्यार्थी आहेत.