सुभाष चौक अर्बनची चौकशी

0

जळगाव। जिल्हा बँक नोटाबदलीच्या घोटाळ्यात सीबीआय पथकाने रविवारी चौकशीचा सपाटा लावला होता. सकाळी बीएसएनएलच्या कार्यालयात चौकशीला सुरुवात करण्यात आली. चोपडा येथील जिल्हा बँक शाखेचे व्यवस्थापक डी.बी. पाटील यांची तासभर, रोखपाल रविशंकर गुजराथी याची दीड तास चौकशी झाली. सुभाष चौक अर्बन पथसंंस्थेचे सल्लागार भरत शहा यांच्या शनिवारी झालेल्या चौकशीनंतर रविवारी व्यवस्थापक अनिल नारखेडे यांची चौकशी करण्यात आली. त्यांना मुबई येथे चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. संशयित नंदकुमार पवार, भूषण तायडे यांचे लॉकर सुभाष चौक अर्बनमध्ये असल्याने त्याची चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांना 29 मार्च रोजी मुबई येथे चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. सीबीआयने सलग तीन दिवस केलेल्या चौकशीनंतर पथक रविवारीच दुपारी मुंबई येथे रवाना झाले आहे.

कागदपत्रांसह माहिती मुंबईला
सीबीआयने चौकशी केल्यानंतर पथक मुंबई येथे काही कागदपत्रासह रवाना झाले आहे. अजून काही दिवसात सीबीआय पथक दाखल होणार असल्याचे संकेत अधिकार्‍यांनी दिले आहे. यासाठी काही संशयितांना देखील मुंबई सीबीआय सेंटर येथे बोलावण्यात येणार आहे.

आम्ही सीबीआयला पूर्ण सहकार्य करीत असून नंदकुमार पवार, भूषण तायडे यांचे लॉकर सुभाषचौक अर्बन पतसंस्थेत आहे. सीबीआय 10 मार्चरोजी पथसंस्थेत येऊन गेली आहे. त्यांचे लॉकर तपासण्यात आले असून खात्रीशीर पुरावे, कागदपत्रे सीबीआयचे अधिकारी घेऊन गेले आहेत . या पथसंस्थेत कोणतेही गैरव्यवहार आम्ही होऊ देत नाही. केंद्र सरकारने नोटाबंदीमध्ये पथसंस्थांना व्यवहार करण्यास मनाई केली होती. त्याकाळात आम्ही कोणतेही व्यवहार केलें नाही. बेकायदेशीर कामे या पथसंस्थेत झालेले नाहीत, असा दावा श्रीकांत खटोड यांनी केला आहे.
पथसंस्थेचा संबंध नाही -श्रीकांत खटोड

संशयित वाढण्याची शक्यता
जिल्हा बँक नोटाबदली घोटाळ्यात भ्रष्टाचाराचे धागेदोरे वाढत असून सीबीआयच्या रडारवर असलेल्या प्रतिष्ठितांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले सीबीआयच्या अधिकार्‍यांंनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आणखी काही सोसायट्या तसेच संशयिताची नावे समोर येत आहेत. जिल्हाभर नोटा बदलीचे जाळे पसरले असून आणखी काही संशयित समोर येणार आहे. 10 संशयिताची चौकशी आतापर्यत करण्यात आली आहे. भरत शहानंतर व्यस्थापक अनिल नारखेडे यांची चौकशी करण्यात आली. सुभाष चौक अर्बनचे नाव आल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.