सुभाष देसाई यांची चौकशी एसआयटीकडूनच व्हावी

0

मुंबई | राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची निवृत्त न्यायाधीश किंवा विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे.

राज्य सरकारने सोमवारीच देसाई यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त सनदी अधिकारी के. पी. बक्षी यांच्या एकसदस्यीय चौकशी समिती जाहीर करण्यात आली. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तटकरे यांनी ही मागणी केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या चौकशीचा फार्स करताना मुख्यमंत्री दिसत आहेत. विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की सुभाष देसाई यांचीसुद्धा चौकशी करावी, अशी विनंती आपण लोकायुक्तांना करणार आहोत. त्यांचे हे आश्वासन कोठे विरले, असा सवालही त्यांनी केला.

एमआयडीसीच्या २१ हजार हेक्टर जमिनीचे आरक्षण काढून तब्बल ५० हजार कोटी रूपयांचा घोटाळा करणाऱ्या सुभाष देसाई यांची केवळ बक्षी समितीकडून केलेली चौकशी चालणार नाही. बक्षी समितीत पोलीस अधिकारी आणि इतर तज्ञांचा समावेश असावा. प्रकरणाशी संबंधित प्रत्येक गोष्टींची चौकशी व्हावी. निवृत्त न्यायाधीश किंवा एसआयटीमार्फत सुभाष देसाई यांची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. सुभाष देसाई मित्र पक्षाचे आहेत म्हणून मुख्यमंत्री त्यांच्या चौकशीबाबत हालचाली करत नाही. मुख्यमंत्र्यांना सरकार सावरायचे आहे म्हणून त्यांनी देसाई प्रकरणात दुटप्पी भूमिका घेऊ नये. ज्याप्रमाणे गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांची चौकशी केली जात आहे त्याप्रमाणे देसाई यांचीही चौकशी व्हावी असे ते म्हणाले.

दुरान्तो अपघाताचीही चौकशी करा
दुरान्तो एक्सप्रेसच्या अपघाताबाबत बोलताना ते म्हणाले की, नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात रेल्वेचे अपघात घडलेले आहेत. आज सकाळीच दुरान्तो एक्सप्रेसचा अपघात झाला. अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांमध्ये एक प्रकारचे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघातांची उच्चस्तरीय चौकशी करावी. चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी. देशात आणि राज्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. अलीकडच्या काळात हा प्रवास असुरक्षित बनत चालला आहे. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांनी यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली.