दीपगरातील 210 प्रकल्पाच्या गेटवरील दुर्दैवी घटना : चौघांविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा
भुसावळ : दीपनगर 210 प्रकल्पाच्या गेटवर सुरक्षा रक्षक व फेकरीच्या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींचा शाब्दीक वाद विकोपाला गेल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी केलेल्या मारहाणीत पीएपी पदावर कार्यरत असलेल्या संजय बळीराम बर्हाटे (46, रा.फेकरी) यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी सोमवारी रात्री 12 वाजेनंतर मृतदेह दीपनगर प्रकल्पाच्या गेटवर आणत दोषींवर कारवाईसाठी दोन तास ठिय्या आंदोलन केले तर मंगळवारी दुपारी पावणेबारा वाजता पुन्हा या मागणीसह मृताच्या वारसास नोकरी लावण्यासह भरपाईसाठी मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतल्याने खळबळ उडाली. दरम्यान दुपारी पावणे बारा ते साडेचार वाजेपर्यंत गेटवरच शववाहिकेत मृतदेह आणल्याने दीपनगर प्रशासनाची भंबेरी उडाली तर मृताच्या वारसास नोकरी मिळण्यासाठी मुख्यालयाकडे तातडीने पत्रव्यवहार करण्यासह तात्पुरता कंत्राटी पद्धत्तीने कामावर घेण्याचे व तातडीची 25 हजारांची मदत देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी हलवण्यात आला.
मारहाणीत पीएपी कर्मचार्याचा मृत्यू
फेकरीतील प्रवीण नामदेव बर्हाटे यांच्या कन्येचे मंगळवारी गावातच लग्न असल्याने रात्री लग्नात स्वयंपाकासाठी आलेल्या हलवाई व इतर मजूर आल्याने त्यांना चहा घेण्यासाठी मुलीचे काका संजय बळीराम बर्हाटे (46) हे दीपनगर औष्णिक केंद्राच्या कॅण्टीनमध्ये जात असताना 210 प्रकल्पाच्या गेटवरील सुरक्षा रक्षकांनी बर्हाटे यांच्याकडे सुरक्षा बुट नसल्याचे कारण सांगून वाद वाढवला व नंतर त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. मारहाणीत बर्हाटे बेशुद्ध पडल्याने त्यांना सुरुवातीला दीपनगर रुग्णालयात हलवण्यात आले व तेथून भुसावळात खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मध्यरात्री मृतदेहासह दोन तास ठिय्या
बर्हाटे यांना मारहाण करणार्या सुरक्षा रक्षकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी मध्यरात्रीच मृतदेह घेवून दीनगर प्रकल्पाच्या 210 गेटबाहेर ठिय्या मांडला. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहकार्यांनी धाव घेवून समजूत काढली मात्र संतप्त नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पहाटे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी धाव घेत नातेवाईकांचे म्हणणे ऐकून घेत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर पहाटे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. मृत बर्हाटे यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, आई-वडील, दोन बहिण , मुलगा तेजस आणि मुलगी सेजल असा परीवार आहे.
चौघांविरोधात खुनाचा गुन्हा : एकाला अटक
पीएपी कर्मचारी संजय बळीराम बर्हाटे (46) यांच्या मृत्यू प्रकरणी सुरक्षा अधिकारी लोकरे, सुरक्षा कर्मचारी सागर मोरे, सुरक्षा कर्मचारी योगेश (पूर्ण नाव नाही), राजेश बनसोड (पूर्ण नाव नाही) व अन्य सुरक्षा कर्मचारी यांच्याविरुद्ध दिलीप बळीराम बर्हाटे (फेकरी) यांच्या फिर्यादीनुसार भुसावळ तालुका पोलिसात भादंवि 302 व 143 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सुरक्षा अधिकारी संजय आनंदा लोकरे यांना रात्री उशिराच अटक करण्यात आली. या घटनेतील संशयीत आरोपी पसार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली.
शवविच्छेदनानंतर मृतदेह पुन्हा आणला गेटवर
मृत संजय बळीराम बर्हाटे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मंगळवारी दुपारी पावणेबारा वाजता नातेवाईकांनी मृतदेह पुन्हा 210 प्रकल्पाच्या गेटवर आणत मृताच्या वारसाला कायमस्वरुपी नोकरी देण्यासह भरपाईची मागणी केली व तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली. यावेळी प्रभारी मुख्य अभियंता नितीन पुणेकर यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र नातेवाईक मागणीवर ठाम राहिले. आमदार संजय सावकारे, शिवसेनेचे समाधान महाजन, फेकरीचे प्रभाकर सोनणे, प्रशांत निकम आदींनी घटनास्थळी भेट दिली. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पुणेकर यांनी मृताच्या वारसाला कायमस्वरुपी नोकरीसाठी मुख्यालयाकडे तातडीने पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन देत तो पर्यंत कंत्राटी पद्धत्तीने नोकरीवर घेण्याचे आश्वासन दिले शिवाय तातडीची मदत म्हणून 25 हजार रुपये मदत देण्याची जाहीर केल्यानंतर मृतदेह गेटवरून हलवण्यात आला. मृत बर्हाटे यांच्यावर दीपनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
साध्या पद्धत्तीने उरकला विवाह
फेकरीतील प्रवीण बर्हाटे यांच्या कन्येचा मंगळवारी नियोजित विवाह असल्याने दीपनगरातील राम मंदिरात अत्यंत साध्या पद्धत्तीने विवाह लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. मुलीच्या काकांचाच मारहाणीत मृत्यू झाल्याने फेकरी गावावरही शोककळा पसरली.