श्रीनगर | दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना चकमकीत टिपून मारले. सतुरा वनक्षेत्रात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर जंगलात तपासणीदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने प्रत्त्युत्तरात ही कारवाई करण्यात आली.
शनिवारच्या कारवाईमुळे आता या वर्षभरात सुरक्षा दल व लष्कराच्या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या 105 वर पोहोचली आहे. गेल्या सात वर्षातील हे सर्वात मोठे यश आहे. याआधी 2010 मध्ये जानेवारी ते जुलै या काळात सर्वाधिक 156 दहशतवादी मारले गेले होते. गेल्यावर्षी या काळात हा आकडा 77 होता. यंदा सर्वाधिक चकमकी दक्षिण कश्मीरमधील पुलवामा, शोपियां आणि अनंतनाग तसेच बांदीपोरा आणि कुपवाड़ा मध्ये झाल्या आहेत.
12 ची हिटलिस्ट
लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी 12 म्होरक्यांची हिटलिस्ट तयार केली आहे. लष्कर कमांडर अबु इस्माइल हे मुख्य टार्गेट आहे. तो दक्षिण काश्मीरमध्ये लपल्याचा संशय आहे. लष्कराने या 12 दहशतवाद्यांचे 12 वाजविण्यासाठी जबरदस्त अभियान छेडले आहे. अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ला जिव्हारी लागल्याने तर लष्कराने दहशतवाद्यांची आश्रयाची अनेक ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत.
यांचा झालाय खात्मा
लष्कर कमांडर बशीर लश्करी
हिज्बुलचा सब्जार अहमद भट
अबु दुजाना
वर्ष : टिपलेले दहशतवादी
2017 : 102
2016 : 77
2015 : 51
2014 : 51
2013 : 43
2012 : 37
2011 : 61
(जानेवारी ते 12 जुलै)