मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणाचे पडसाद मंत्रालयात देखील उमटले. मंत्रालयात लावलेली कडक सुरक्षा भेदत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांन मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. सायंकाळी ५:३० च्या सुमारास पोलीसांचा कडक बंदोबस्त असतानाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करीत गळ्यात राष्ट्रवादीचे उपरणे आणि हातात सरकार आणि मुख्यमंत्र्यांचे फलक उंचावत मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर सरकारच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मुख्यमंत्री मुर्दाबाद, दलित विरोधी मुख्यमंत्री चले जावच्या घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिल्या. त्यानंतर या कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. मंगळवारी सकाळपासूनच भीमा कोरेगाव घटनेच्या पार्शवभूमीवर मंत्रालय आणि परिसरात पोलिसांचा नेहमीपेक्षा अधिक बंदोबस्त लावण्यात आला होता. मंत्रालयात येण्यासाठी प्रवेश पास आणि कडक चेकिंग व्यवस्था असताना देखील सायंकाळी 5 च्या सुमारास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलिसांना चकमा देत मंत्रालयात आले व त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयासमोर निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही घोषणाबाजी करतच बाहेर पडले.