पुणे । महापालिकेच्या विविध विभागाच्या सुरक्षेसाठी कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. पालिकेने सर्व विभागांकडून आवश्यक सुरक्षा रक्षकांची यादी मागवली होती. त्यानुसार आता 1 हजार 300 सुरक्षारक्षकांची आवश्यकता आहे. मात्र, याबाबत सतत होणार्या आरोपामुळे प्रशासनाकडून सुरक्षा विभागाचे थर्ड पार्टी ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑडीट करणार्या संस्थेचा शोध प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे.
शहर परिसरात महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेच्या अखत्यारीत 500 ते 600 अस्थापने येतात. या अंतर्गत महापालिका इमारत, नाट्यगृहे, क्षेत्रिय कार्यालये, सरकारी शाळा, पाण्याच्या टाक्या, उद्याने, शहरातील पुतळे, यांच्या सुरक्षेची जबाबदारी पालिकेच्या सुरक्षा विभागाची आहे. या विभागात कंत्राटी पद्धतीने सुमारे 1700 ते 1800 सुरक्षा रक्षक काम करतात. मात्र ही संख्या अतिरिक्त असल्याने 900 कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाने 900 सुरक्षा रक्षकांची निविदा मान्य केली आहे. त्यामुळे अतिरिक्त सुरक्षा रक्षकांचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. पालिका प्रशासनाने विविध खात्यांकडून यासंदर्भात माहिती मागवली होती.
…तर वर्षाला होणार 7 कोटी 20 लाखांची बचत
महापालिकेला आता किती सुरक्षारकांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सातत्याने गैरहजर राहणार्या आणि अतिरिक्त असलेल्या सुरक्षारक्षकांना कमी करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने 500 सुरक्षारक्षक कमी केल्यास वर्षाला 7 कोटी 20 लाख रुपयांचा अतिरिक्त भार कमी होणार आहे. मात्र याबाबत विरोधी पक्षकाडून सुरक्षा रक्षक कपातीबाबत मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सुरक्षा विभागाचे थर्ड पार्टी ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑडीट करणार्या संस्थेचा शोध प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे.