सुरक्षेचा तमाशा

0

अब्रू वाचविण्यासाठी 12 वर्षांच्या चिमुरडीने तिसर्‍या मजल्यावरून उडी मारली. पुण्यात एका विवाहितेने याच कारणासाठी पहिल्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीतून खाली उडी टाकली. दोघीही सध्या अत्यवस्थ आहेत. चिमुकलीच्या डोक्याला आणि मणक्याला दुखापत झाली आहे. ही दुखापत कदाचित जीवघेणी ठरेल किंवा तिला कायमचे अपंगत्व देऊन जाईल. पण मुद्दा तो नाही. एका बारा वर्षाच्या चिमुरडीलाही जिवापेक्षा अब्रूचे भय वाटते, हे चिंताजनक आहे. आजवरच्या सगळ्या स्त्रीमुक्ती चळवळींचे आणि स्त्रीकेंद्रित म्हणवल्या जाणार्‍या कायद्यांचेही अपयश आहे.

भारताला अब्रू वाचविण्यासाठी 12 वर्षांच्या चिमुरडीने तिसर्‍या मजल्यावरून उडी मारली. पुण्यात एका विवाहितेने याच कारणासाठी पहिल्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीतून खाली उडी टाकली. दोघीही सध्या अत्यवस्थ आहेत. चिमुकलीच्या डोक्याला आणि मणक्याला दुखापत झाली आहे. ही दुखापत कदाचित जीवघेणी ठरेल किंवा तिला कायमचे अपंगत्व देऊन जाईल. पण मुद्दा तो नाही. एका बारा वर्षाच्या चिमुरडीलाही जिवापेक्षा अब्रूचे भय वाटते, हे चिंताजनक आहे. आजवरच्या सगळ्या स्त्रीमुक्ती चळवळींचे आणि स्त्रीकेंद्रित म्हणवल्या जाणार्‍या कायद्यांचेही अपयश आहे.

त्याहूनही भयानक आहे ती आपली मानसिकता. त्या मुलीने तिसर्‍या मजल्यावरून उडी मारण्याआधी आरडाओरडा केला. तेव्हा दुसर्‍या मजल्यावर काही जण उभे होते. गॅलरीतून डोके बाहेर काढून वर बघणारी ही मंडळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसताहेत. तळमजल्यावरच्या गॅरेजवाल्याने त्या मुलीला झेलण्याचा प्रयत्न केला. रिक्षाचे कव्हर आणले. याचा अर्थ तीने उडी मारण्याच्या काही मिनिटे आधीच लोकांना त्याची जाणीव झाली होती. या दरम्यान दुसर्‍या मजल्यावरच्या बघ्यांपैकी काही जण जरी तिसर्‍या मजल्यावर तिच्या मदतीसाठी धावले असते, तरी अनर्थ टळला असता. त्या मुलीला थोडा धीर आला असता. कदाचित आरोपी पकडला गेला असता. पण आपण आपली जागा सोडून हलत नाही. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी पुढे सरसावत नाहीत हेच खरे. आपला हा षंढपणा किती टोकाचा आहे हे अधोरेखित करणार्‍या अजून दोन घटना अलीकडेच घडून गेल्यात. काही दिवसांपूर्वी जागेच्या वादावरून एक्सप्रेस ट्रेन मध्ये महिलेला मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तरुणांचे टोळके त्या महिलेला बेदम मारहाण करत होते. तिची मुलगी मदतीसाठी याचना करत होती. पण एकाही सहप्रवाशाने त्या तरुणांना थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. ना कुणी रेल्वे हेल्पलाईनला फोन केला.

अशावेळी ज्या प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ व्हायरल केला त्याचे अभिनंदन करायचे की अजून काही, हे सुद्धा कळत नाही. त्याने व्हिडीओ काढला म्हणून घटनेला वाचा तरी फुटली, पण त्यानेही तत्क्षणी अन्यायाविरोधात आवाज उठवला नाही हेही मान्य करायला हवे. मागाहून न्याय मिळेल न मिळेल माहित नाही, पण अनेकांच्या डोळ्यादेखत एका महिलेवर हल्ला झाला तेव्हा आपण ते रोखू शकलो नाही हेच खरे. समाज मन जेव्हा असे षंढ बनते, तेव्हा उपद्रवी मनोवृत्तीच्या लोकांचे फावते. आपल्याला अडविणारे कुणी नाही, ही भावना बळावते. गुन्हा घडल्यानंतर पुढे तक्रार दाखल होते. तपास होतो. आरोपींना शिक्षा होते किंवा कायद्यातील पळवाटा शोधून ते स्वतःला सुरक्षित करतात. पण ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याचा धाकही कमीच. गुन्हेगारांवर वचक बसविण्याचे खरे दायित्व प्रत्यक्षदर्शींवरच असायला हवे. एखाद्याची हत्या झाल्यानंतर आरोपींना कितीही शिक्षा झाली तरी पीडिताचे प्राण परत येत नाहीत. ज्यांच्यावर अन्याय, अत्याचार झालेत त्यांच्या मनावरचे घाव भरत नाहीत. त्यामुळे गुन्हा रोखणे हेच आपले पहिले कर्तव्य असायला हवे. तसे घडले नाही तर विघातक प्रवृत्तींचे साहस वाढते. एक्सप्रेसमध्ये महिलेवर हल्ला झाला तेव्हा कुणीच पुढे सरसावले नाही. म्हणूनच परवा मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये महिलेला मारहाण झाली. सगळ्यांच्या डोळ्यांदेखत तिचे कपडे फाडले गेले. भलेही तो आरोपी त्या महिलेच्या परिचयाचा असेल. पण सार्वजनिक ठिकाणी एका महिलेवर हात उचलला जातो. तिचे कपडे फाडण्यापर्यंत आरोपीची हिंमत जाते, हे आपल्या समाजासाठी नक्कीच भूषणावह नाही. कारण काहीही असो, खुलेआम कुणाची तरी प्रताडना होते आणि बाकीचे मूक बघत बसतात हे सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही. अशाने माणसाच्या मनातील सुरक्षिततेची भावनाच नष्ट होईल.

एक काळ असा होता जेव्हा माणूस एकटेपणाला घाबरायचा. निर्जन स्थळी मनात भय दाटून यायचे. चार माणसे नजरेला पडल्यावर मात्र जीव भांडयात पडायचा. कुणाची तरी सोबत आहे, ही भावना आश्‍वासक असायची. अलीकडे मात्र या विश्‍वासालाच तडा जाऊ लागलाय. भर बाजारातही एकटेपणा जाणवू लागलाय. आजूबाजूला कितीही लोक असले तरी आपले कुणीच नाही, अशी भावना निर्माण होऊ लागलीय. गर्दीतले हे एकटेपण व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहे. शिवाय समाजालाही याचे भयंकर पडसाद भोगावे लागणार आहेत. असुरक्षित जीव हा कायम प्रचंड आक्रमक असतो. अविचारी होतो. यातून कधी तोही स्वतःचा नाश ओढवून घेतो तर कधी कोणतेही तारतम्य न ठेवता इतरांच्या नाशाला सिद्ध होतो. सध्या आपण याच अराजकतेच्या उंबरठ्यावर आहोत. तमाशाचे बघे होण्यापेक्षा, अन्यायाशी दोन हात करण्याची आपण वेळीच सवय लावून घेतली नाही तर हा प्रश्‍न अधिक गंभीर होऊ शकतो. तेव्हा सावधान!

सृष्टी गुजराथी
मुक्त पत्रकार, लेखिका मुंबई
9867298771