रोख रक्कम, दागिण्यांसह 47 हजार 800 चा ऐवज लांबविला
लग्नासाठी गेलेल्या लक्झरींचे भाड्याचे द्यायचे होते पैसे
जळगाव- सुरतला सालीच्या मुलाच्या लग्नासाठी गेलेल्या शिवाजीनगरातील चिस्तीया पार्कमधील फळविक्रेत्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने असा 47 हजार 800 रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी समोर आली आहे. दरम्यान पैसे लग्नाला जाण्यासाठी केलेल्या दोन लक्झरी बसेसच्या भाड्याचे होते, मात्र चोरट्यांनी लांबविल्याने फळविक्रेत्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
शिवाजीनगरातील प्लॉट नं जी 5, गट नं 345, चिस्तीया पार्क, बाबा टॉवरच्या बाजूला येथे शेख शरफुद्दीन शेख शेरोद्दीन वय 40 हे पत्नी , 4 मुली व एक मुलगा या कुटुंबासह राहतात. ते रेल्वेस्टेशनवर हातगाडी लावून फळविक्री करतात. शेख शरफुद्दीन हे यांच्या जळगावातील अक्कड सासुच्या मुलाचे सुरतला लग्न होते. लग्न असल्याने 26 रोजी रात्री 10.30 वाजता सुरत गेले होते.
शेजारच्यांमुळे घटना उघड
लग्न आटोपून कुटूंब 28 रोजी सुरतहून जळगाव परतत होते. यादरम्यान पारोळ्याजवळ सकाळी 7.14 वाजता शेजारी शे अजीम शे हमीद यांचा मोबाईलवर फोन आला. त्यांनी तुमच्या लोखंडी व लाकडी दोन्ही दरवाजाचे कुलूप तुटले असून घरात कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले असल्याचे सांगितले. शेख शरफुद्दीन यांनी लहान भाऊ शाबुद्दीन याला घरी पाठविले. त्याने पाहिले असता चोरीचे झाल्याचा प्रकार समोर आला. शेख शरफुद्दीन कुटुंबासह 28 रोजी सकाळी 9 वाजता जळगावात पोहचले.
रोख रकमेसह दागिण्यांवर डल्ला
शेख शरफुद्दीन यांच्या घराचे लोखंडी व लाकडी दोन्ही दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने प्रवेश करत खालच्या खोलीतील कपाटातील 20 हजार रोख, घरातील वरच्या रुममध्ये असलेल्या कपाटात मुलांनी जमविलेले 7000 हजार तसेच 17 हजार 800 रुपयांची कानातील सोन्याचे एक जोड रिंग व 3 हजार रुपयांच्या चांदीच्या साखळ्या असा एकूण 47 हजार 800 रुपयांचा ऐवज लांबविला. शहरात पोहचल्यावर शेख शरफुद्दीन यांनी शहर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार सुरेश पाटील करीत आहेत.
लक्झरी बसेसच्या भाड्याचे पैसे लांबविले
शेख शरफुद्दीन यांनी लग्नासाठी जळगावच्या नातेवाईकांना सुरत जाण्यासाठी दोन लक्झरी बसेस केल्या होत्या. लक्झरींच्या भाड्याचे पैसे 20 हजार रुपये घरीच ठेवले होते. लक्झरी मालकाने सुरतलाच पैशांची मागणी केल्याने एका नातेवाईकाकडून पैसे घेतले व लक्झरीचालकाला रक्कम दिली. संबंधित नातेवाईकाला घरी पोहचल्यावर पैसे देण्याचे कबूल केले होते. मात्र घरी पोहचण्यापूर्वी पारोळ्याजवळ घरात चोरी झाल्याचे कळाल्याचे शेख शरफुद्दीन यांनी बोलतांना सांगितले.