सुरत पॅसेंजर रद्दचा प्रवाशांना फटका ; रेल्वे स्थानकाला यात्रेचे स्वरूप

0

भादलीजवळ तिसर्‍या रेल्वे लाईन जुळवणीचे काम ; तीन दिवस आणखी होणार मनस्ताप

भुसावळ- भादलीनजीक तिसर्‍या रेल्वे लाईन जुळवणीच्या (इंटर लॉकींग) कामाला गुरुवारपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी 6 रोजी डाऊन 59013 सुरत-भुसावळ पॅसेंजर व डाऊन 59077 सुरत-भुसावळ पॅसेंजर व अप 59014 भुसावळ-सुरत पॅसेंजर व 590758 भुसावळ-सुरत पॅसेंजर रद्द करण्यात आल्याने खान्देशातील प्रवाशांना मोठा फटका बसल्याने त्यांचे अतोनात हाल झाले. सकाळी सुरतकडे जाणार्‍या अन्य गाड्यांवर प्रवाशांची गर्दी झाल्याने रेल्वे स्थानकाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान, नवी दिल्ली तसेच उत्तर प्रदेशकडून मुंबईकडे जाणार्‍या सात प्रवासी गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्याने प्रवाशांना चांगलाच मनस्ताप गुरुवारी सोसावा लागला तर दोन ते तीन तास या गाड्या उशिराने धावल्या. शुक्रवार ते रविवारपर्यंत आणखीन तीन दिवस रेल्वे प्रवाशांना या गैरसोयींचा सामना करावा लागणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

सात गाड्या धावल्या उशिराने
भादली रेल्वे स्थानकावरील कामामुळे तसेच तांत्रिक अडचणीमुळे अप 15644 गुवाहाटी एलटीटी तीनस तास, अप 12628 न्यू दिल्ली-बंग्लोर कर्नाटका एक्स्प्रेस तीन तास, 12860 हावडा-छत्रपती शिवाजी टर्मीनल गीतांजली एक्स्प्रेस दोन तास, अप पुष्पक एक्स्प्रेस तीन तास, अप 19046 ताप्ती गंगा तीन तास तसेच अप कामायनी 11072 दिड तास उशिराने धावली. या शिवाय या गाड्या भुसावळसह, बर्‍हाणपूर व अन्य स्थानकावर प्रत्येकी अर्धा ते एक तास थांबवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले या शिवाय अप मार्गावरील काही गाड्या अर्धा ते एक तास उशिराने धावल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सोसावा लागला.

रेल्वे स्थानकावर यात्रेचे स्वरूप
अप-डाऊन मार्गावरील सुरत पॅसेंजर गुरुवारपासून चार दिवस रद्द झाल्याने खान्देशातील प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे शिवाय गुरुवारी सकाळी सुरतकडे जाणार्‍या गाड्यांना प्रवाशांची गर्दी झाल्याने रेल्वे स्थानकाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. ऐनवेळी गाड्या रद्द झाल्याने शिवाय प्रवाशांना लागलीच आरक्षित तिकीट उपलब्ध न झाल्याने काही प्रवाशांना बसेसचा आधार घेतल्याने बसस्थानकावरही प्रवाशांची गर्दी झाली होती मात्र एकही जादा गाडी सोडण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

तीन दिवस सुरत पॅसेंजर रद्द
डाऊन 59075 सुरत-भुसावळ पॅसेंजर 6 ते 9 तर अप 59076 भुसावळ-सुरत पॅसेंजर 6 ते 10 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. डाऊन 51181 देवळाली-भुसावळ पॅसेंजर 6 ते 10 तर अप 51182 भुसावळ-देवळाली पॅसेंजर 5 ते 9 दरम्यान रद्द असून डाऊन 51153 मुंंबई-भुसावळ पॅसेंजर व अप 51154 भुसावळ-मुंबई पॅसेंजर 6 ते 9 दरम्यान रद्द करण्यात आली असून बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.