सुरळीत वाहतुकीच्या उपाययोजना फोल

0

खडकी । शहरातील खडकी तसेच स्वारगेट परिसरातील वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतुकीत काही प्रमाणात बदल केले आहेत. त्यामुळे सुरळीत वाहतुकीसाठी पोलिसांकडून विविध उपाय सुरू असले, तरी त्यात यश येत नसल्याचे चित्र आहे. आता पुन्हा या व्यवस्थेत बदल करण्यात येत असून यासाठी वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

खडकीमध्ये खडकी बाजार व बोपोडी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक समस्या आहे. त्या लक्षात घेऊन खडकी भागातील वाहतूक सुरळीत चालावी, यासाठी येरवडा-विश्रांतवाडीकडून येणारी खडकी बाजारात राहणारे नागरिक व कामासाठी जाणारी वाहने सोडून इतर सर्व प्रकारची चारचाकी वाहने व जड वाहनांनी होळकर पुलावरून डावीकडे वळून आठमुळा रोडकडे पाचवड चौक, आरगडे, आठमुळा सर्कल, पोल्ट्री चौक या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या वाहनांना होळकर पूल ते खडकी बाजारमार्गे बोपोडी चौकात जाण्यास बंदी करण्यात आली आहे.हिंजवडी वाहतूक विभागाअंतर्गत अशोक सोसायटी, क्षेत्रीय कार्यालय ते तापकीर चौकापर्यंत पी-1, पी-2 करण्यात येत आहे. निगडी वाहतूक विभागांतर्गत थरमॅक्स चौक ते कृष्णानगर चौकादरम्यानही पी-1, पी- 2 करण्यात आले आहे.

तिरंगा हॉटेलजवळ नो पार्किंग
पुणे-सातारा रस्त्यावर ते तिरंगा हॉटेल दरम्यान 100 मीटर अंतरावर दोन्ही बाजूस नो पार्किंग करण्यात येत आहे. पुष्पमंगल कार्यालय ते नवकार सोसायटीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो-पार्किंग करण्यात येत आहे. स्वारगेट वाहतूक विभागाअंतर्गत शंकरशेठ रोडवरील सारसबागेकडे जाणार्‍या रस्त्यावर हॉटेल नटराज समोरील बस स्टॉपच्या पुढे व मागे 100 मीटर अंतरावर नो पार्किंग करण्यात येत आहे. तसेच जेधे चौकातील ओव्हरब्रीज व होल्गा चौकातील ओव्हरब्रीजखाली नो पार्किंग करण्यात आले आहे. चंद्रमा चौक ते टाटा कम्युनिकेशन दिघी व विश्रांतवाडी चौक ते केकाण पेट्रोल पंप एअर पोर्ट रोडवर ताशी 40 किमी वेग मर्यादा करण्यात येत आहे. तर चतुशृंगी वाहतूक विभागाअंतर्गत मॅक्डोनाल्ड औंध ते कुबेरा गुलशन सोसायटीपर्यंत वायरलेस कॉलनीमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला नो पार्किंग करण्यात येत आहे.