बोदवड- तालुक्यातील सुरवाडे येथे घराबाहेर ठेवलेल्या कापसाला आग लागल्याने यशवंत केशव पाटील यांच्या घराला आग लागून संसारोपयोगी साहित्यासह अन्न-धान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. मध्यरात्रीची वेळ असल्याने आगीची झळ शेजारच्या दोन घरांनाही बसल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. बोदवड पोलिसात या प्रकरणी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. समजलेल्या माहितीनुसार, पाटील यांच्या घराबाहेर ठेवलेल्या कपाशीसह धान्याला गुरुवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्याने शेजारच्या दोन घरांनाही आगीची झळ बसली. स्थानिक पोलिस पाटलांना बोदवड पोलिसांना पहाटे तीन वाजता दूरध्वनी करून आगीची कल्पना दिल्यानंतर पोलिसांनीही धाव घेतली तर भुसावळ पालिकेच्या अग्निशमन दलाने तीन ते चार फेर्या करून आगीवर नियंत्रण मिळवले मात्र आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. भुसावळ अग्निशमन दलाचे चालक कैलास कोळेकर, डिगंबर येवले, विजय मनोरे आदींनी आगीवर नियंत्रण मिळवले.