सुरवाणी 132 केव्ही उपकेंद्राचे काम दीड वर्षांतच प्राधान्याने पूर्णत्वास नेणार

0

नंदुरबार । अक्राणी तालुक्यातील सुरवाणी येथील 132/33 केव्ही उपकेंद्राचे काम कालमर्यादेत पूर्ण होईल. येत्या दीड वर्षात या उपकेंद्राचे काम पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. सुरवाणी येथील 132 केव्ही उपकेंद्राचे भूमीपूजन ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल अध्यक्षस्थानी होते. यावेळी खासदार डॉ. हीना गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार डॉ. के. सी. पाडवी, आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार उदेसिंग पाडवी, शहादाचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, डॉ. कांतिलाल टाटिया, नागेश पाडवी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकार्‍यांचे ऑनलाईन नियंत्रण
दुर्गम भागात वीज पोहोचविण्यासाठी 65 हजार रुपयांत सौर वीज जोडणी देण्यात येईल. या योजनेनुसार घरातील दिवे, पंखे, पथदिवे सुरू राहू शकतील. तसेच 5 वर्षे हा प्रकल्प कार्यरत राहील. अटल सौर कृषी पंप योजनेत आणखी एक हजार पंपांचा लाभ जिल्ह्यास देण्यात येईल. एमआरइजीएस योजनेंतर्गत विहिरींना वीज जोडणी देण्यात येईल. जिल्ह्यात 220 केव्ही केंद्रासह वीज पुरवठ्यासाठी सुमारे 800 कोटी रुपये खर्चून आराखडा तयार करण्यात येत आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी या योजनेला आणखी सात दिवसांची मुदतवाढ दिली असून पात्र शेतकर्‍यांनी या योजनेचे ऑनलाइन अर्ज भरावेत, असेही आवाहन ऊर्जा मंत्री श्री. बावनकुळे यांनी केले.

उपकेंद्रामुळे नागरिकांचे जीवनमान बदलेल
या उपकेंद्रामुळे परिसरातील नागरिकांचे जीवनमान बदलणार आहे. सन 2022 पर्यंत प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचविण्याचे केंद्र सरकार व राज्य शासनाचे धोरण आहे. तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असेही पालकमंत्री रावल यांनी नमूद केले. खासदार डॉ. गावित यांनी , या भागातील वीज प्रश्न गंभीर होता. या उपकेंद्रामुळे तो सुटण्यास मदत होणार आहे. तसेच दळण- वळणाच्या सुविधाही वाढतील, असे सांगितले. आमदार डॉ. गावित म्हणाले, या उपकेंद्रामुळे परिसरातील विजेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते झालेला भूमीपूजनाचा उपक्रम चांगला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
सुरवाणीच्या उपकेंद्राचे काम दीड वर्षात पूर्ण करण्यात येईल. वन विभागाशी निगडीत अडचणी महिनाभरात सोडविण्यात येतील. त्यानंतर या उपकेंद्राचे काम दीड वर्षांत पूर्ण करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येईल. या कामाचे कार्यकारी अभियंता, सहव्यवस्थापकीय संचालक श्री. बकोरिया दर दोन महिन्यांनी कामाचा आढावा घेतील. आगामी दोन वर्षात नंदुरबार जिल्ह्यातील घराघरापर्यंत वीज पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. श्री. रघुवंशी यांनी मार्गदर्शन केले. वीज वितरण कंपनीचे अधिकारी गीते यांनी प्रास्ताविक केले. अभियंता विनोद ढोले यांनी आभार मानले.