सुरांनाही इथे जेव्हा भाले फुटतात!

0

परवा संभादादाचा फोन आला ‘राजबा सोड आता ही पत्रकारिता. माध्यमांना फॅसिस्टांच्या फौजेने कधीच गिळंकृत केले आहे. रस्त्यावर उतरल्याशिवाय काही गत्यंतर नाही, आता आरपारचा लढा झाला पाहिजे’, त्याचा प्रत्येक शब्द मला विचलित करत होता. आम्ही जेव्हा सिद्धार्थ विहार वसतिगृहात एकत्र राहायचो तेव्हा सर्वसाधारण 1986-87 चा काळ होता. त्याने एक साध्या मराठी टाइपराइटरने टाइप केलेल्या पुस्तकाच्या कच्च्या लेखनाची कॉपी वाचायला दिली होती. त्याचे आत्मचरित्र होते ते. वाचून बघ कसे वाटतेय? मला ते प्रकाशित करायला द्यायचंय, असे म्हणाला होता तो. ‘कातळाखालचे पाणी’ नावाने ते प्रसिद्ध झाले. मी होस्टेलच्या रूममध्ये बसून ते वाचत होतो. त्यातल्या ‘वळवातील आई’ वाचताना मी ढसाढसा रडलो होतो. माझी आई आणि माझ्या बालपणीचे प्रसंग माझ्या डोळ्यासमोर तेव्हा उभे राहिले होते. तेव्हाच संभाजीची एक दमदार लेखक, कवी, शाहीर आणि रस्त्यावरच्या नुक्कड नाटकांचा बादशहा म्हणून मला ओळख झाली होती. तो आज महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक शाहीर आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो.

आपल्या भोवतालचे वास्तव ठोक शब्दांत मांडत त्यातून विद्रोहाची ज्वाला फुलवण्यासाठी संभाजीने नवे, व्यवहारातले शब्द शोधले. मुंबईच्या धारावीत भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनात त्याने ‘हे पालखीचे भोई, यांना आईची ओळख नाही’ हे गीत सादर केले तेव्हा सर्व परिवर्तनवाद्यांमध्ये एक चैतन्य निर्माण झाले होते. संभाजीने त्याच्या कलेच्या माध्यमातून कायमच आंबेडकरी चळवळीचा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रात त्याचे प्रबोधनपर जलसे जागृती करत फिरत आहेत. मराठीच्या काही बोलीभाषांतही त्यांची गाणी गाजली आहेत. त्यांची पुस्तके विद्यापीठात अभ्यासासाठी नेमली गेली आहेत. लोककलेच्या प्रसार आणि प्रचारासाठी संभाजीने बरीच व्याख्याने दिली आहेत. एका गरीब कुटुंबात जन्म घेतलेला हा लोकशाहीर मूळचा पाचगणी जवळच्या महू गावातला. त्याचे बालपण गावातल्या कुणबी आणि मातंग समाजातल्या कलावंतांची गायकी ऐकतच गेले. त्यांच्या भजनांवर आणि भारुडांवर संभाजीचा कलावंत पिंड पोसला गेला. संभाजीने आजवर अनेक पोवाडे गायले आहेत. राष्ट्रपतींचे गोल्डमेडल मिळालेल्या ‘कोर्ट’ या चित्रपटातले एक गाणे त्याने गायले आहे. शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या प्रसिद्ध नाटकामुळे त्याला नवी ओळख मिळाली. त्या नाटकाची मूळ संकल्पना, नाटकातली गीते व संगीत संभाजीचेच आहे. या नाटकाला मिफ्टा अ‍ॅवॉर्ड मिळाला. त्यानंतर ‘शिवाजी अंडरग्राउंड’ची दिल्लीची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा भरवत असलेल्या आंतरराष्ट्रीय भारंगम नाट्यमहोत्सवासाठीही निवड झाली. त्याच्या विद्रोही जलस्याने आज महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात समाज पुन्हा जागा होऊ लागला आहे. काय सांगताहेत त्याच्या गाण्यांचे बोल…

इथून पुढे इतिहास, कला, साहित्य, संस्कृती, सौंदर्यशात्र, तत्त्वज्ञान यांचे भान विद्यापीठे देणार नाहीत. तुम्हाला मैदानात यावे लागेल. या देशात आणीबाणी होतीच, आत्ता न्यायालयाचे निकाल आणि पोलिसी कारवाईतून ती अधिक स्पष्ट दिसू लागली आहे. उगाच भ्रमात राहू नका. तुमची जात, तुमचा धर्म, तुमची वैचारिकता, तुम्ही कोणाच्या बाजूला उभे आहात, हे लपवून ठेवता येणार नाही, त्यांनी स्पष्ट रेषा आखली आहे. लोकशाहीच्या बाजूने रणांगणात उतरलेल्या सैनिकांनो, आपल्या आतल्या गोटातील मतभेदांना खतपाणी घालणारे काही भोळसट पंडीत, काही सुपारी बहाद्दर, काही खबरी, आता वाढतील. विखूरलेल्यांना आधिक गोंधळात टाकतील, हा प्रतिक्रांतीचा काळ आहे. मतभेदांची राळ उडवण्याची वेळ नव्हे. क्रांती करताना एकमेकांच्या यथेच्छ झडत्या घ्या. उरावर बसा एकमेकांच्या. पण….आज एकत्र नांदा, तरच जगाल! हे सांगण्याचा प्रयत्न त्याच्या गाण्यातून सुरू आहे. तोड मर्दा, तोड ही चाकोरी। मुक्तीचं गीत म्हण रात हाय अंधारी॥ इथून त्याचा सुरू झालेला त्याचा एल्गार आता उच्च स्तरावर पोहोचला आहे.

ये जात क्यू? ये धर्म क्यू? ये किस लिए बनाये है।
ये कत्ल के नुमाएंदे इन्सा को क्या शिखाएंगे॥
सदियोंकी कैद क्यू है जुल्मों के इस जंजीर मे।
हैवान की औलाद क्यू इन्सान के मंदिर मे॥
असा सवाल करत तो हिंदू मुस्लीम दंगलीच्या मध्ये भिंत बनून उभा राहिला. त्याने लालकृष्ण आडवाणींच्या रामरथावर आसूड ओढले.

ये हिटलर के साथी। ये जनाजोंके बाराती॥
पुछते हैं इन्सान को कौन है तू?
चोर चिटर बैठे है भाई। बडे सेटर बैठे है भाई॥
अशा शब्दांत त्याचा जलसा आताच्या वास्तवावर घन घालतो आहे. स्रैण मानसिकतेच्या मानवांनी पुढे यावे. पुरुषी मानसिकता तोडफोडवादी, शुद्धतावादी, भयगंडाने पछाडलेली असते. मी किती शहाणा आणि मी किती पोथ्यांची पारायणे केली हे दाखवण्याच्या नादात मश्गुल असते. लाल आणि निळी जाणवी घातलेल्या कर्तव्यशून्य भटांनी आत्तापर्यंत खूप वाट लावली आहे. आता तरी जागे व्हा, अशी आर्त हाक त्याचा जलसा देतो आहे. तुम्ही तुमचे मित्र ओळखा, तुम्ही तुमचे शत्रू ओळखा, तुम्ही हजारो युद्धं जिंकू शकता. जात, धर्म, वंश, देश यांच्या निबिड जंगलात वाट हरवलेल्या सर्व प्राणिमात्रांस माणुसकीचा सूर्य आणि सुखी जीवनाची वाट सापडो, असे म्हणत भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याची शपथ तो देतोय. हृदयाने आणि मेंदूने जागा झालेला हजारोंचा जमाव त्याचा उदंड प्रतिसाद देतो आहे. प्रत्येक श्‍वासाला दाद आणि प्रश्‍नांना उत्तरे देण्यासाठी तो सज्ज झाला आहे.

या कत्तलीच्या राती।
हरपून गेले भान रे॥
अरे पोळले, पोळले, पोळले
हात त्यांना विस्तवाचे दान रे॥
अशा गुलाम काळ्या राती। सूर्याचे गीत कुणी गाती।
मनू धर्माची केली माती॥

त्याचे अडगळ (नाटक), कातळाखालचे पाणी (आत्मचरित्र), तोड ही चाकोरी (गाण्यांचा संग्रह), रणहलगी (लेखसंग्रह) ‘उंदीर’ नावाचे भारुड आणि ‘गिरणीचा वग’ हे मुक्तनाट्य, बॉम्बे- 17 (नाटक) – प्रायोगिक, एकपात्री दीर्घांकी ‘अडगळ’चे त्यांनी केलेले हे व्यावसायिक रूपांतर आहे.

शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला (नाटक), गिरणीचा वग, विविध कलाकृतींची रेलचेल असलेला ‘रणहलगी’ हा वाद्यवृंद, सृजनाचा एल्गार, उंदीर (भारूड), जीव एकटा एकटा (पोवाडा), माझे गं माय (पोवाडा) हे साहित्य कलेचे योगदान मोलाचे आहे. ‘कोर्ट’, ‘सरपंच भगीरथ’ या चित्रपटांचे संगीत आणि गाणी संभाजीचीच होती. त्यांतली काही गाणीही त्याने गायली आहेत. त्याने आंबेडकरी जलसा नव्याने उभा केला. तो आज महाराष्ट्राच्या गावोगावची जमीन तुडवतोय. तुम्ही तुमचे मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखा. तुम्ही अंधारात दगड मारत आहात. तुम्हाला प्राप्त परिस्थितीची चिकित्सा करता आली पाहिजे. इतिहासाची चिकित्सा करता आली पाहिजे. स्वतःचीही चिकित्सा करता आली पाहिजे, असे तो सांगतोय. त्याच्या गाण्यांचे शब्द स्वाभिमानाचे जीणे अन् भाकरीची भाषा बोलताहेत. ही साधी वाक्ये नाहीत. ही तर एक आयडियालॉजी आहे. सत्ता, संपत्ती आणि सडक्या संस्कृतीच्या दलालांना उद्ध्वस्त करणारी. त्याच्या शब्दसुरांना जणू भाले फुटले आहेत, अंताच्या लढाईसाठी.

इतिहास आपल्यालाच लिहावा लागेल!
त्याने निळे, भगवे, लाल अथवा पांढरे जानवे परिधान केलेलेे नाही. त्याचे स्वर निघालेत अंधाराला कापत, सडलेल्या संस्कृतीच्या गढीला धडका देत, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांना साद घालत, माणसाला माणूस म्हणून उभा राहण्याचा हक्क मिळावा म्हणून…
त्याची गाणी रोखलेल्या बंदुकीसमोर बहाद्दरांना छाती काढून उभी करताहेत,
तो सांगतोय…
हे असे असले तरी,
हे असे असणार नाही.
दिवस आमचा येत आहे,
तो घरी बसणार नाही.
आपला इतिहास आपल्यालाच लिहावा लागेल, असे सांगणारा विद्रोही लोकशाहीर संभाजी भगत याच्या डफाची थाप आता महाराष्ट्राच्या ग्रामीण वस्त्यांमध्ये घुमू लागली आहे. त्याचा जलसा रोज होतोय! हजारो लोक या चळवळीचा भाग होत आहेत! संविधानाच्या सरनाम्याची शपथ घेऊन मनूवाद्यांना गाडायला सज्ज होतोय लाखोंचा जनसागर!!!

– राजा अदाटे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
8767501111