सुराज्यासाठी गणेशोत्सव साजरा करा

0

पुणे । यंदाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सव आहे. त्यानिमित्त सर्व गणेशमंडळांनी 2022 सालचा नवभारत कसा असेल, या विषयीचे देखावे साकारावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लोकमान्यांनी स्वराज्यासाठी गणेशोत्सव सुरू केला, आता सुराज्यासाठी गणेशोत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी नमूद केले.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे महापालिकेच्या वतीने महिनाभर वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी शनिवारवाडा येथे मोठ्या दिमाखात झाला. महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेले बोधचिन्ह, शुभंकर, पिवळा ध्वज आणि थीम साँगचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व मानाच्या गणपती मंडळांच्या पदाधिकार्‍यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

नवभारताचा संकल्प हाती घ्या
गणेशोत्सव हा सामाजिक उत्सव आहे. या उत्सवाचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने चांगली सजावट, रेखीव मूर्त्या, सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासोबतच 2022 चा नवभारत कसा असेल यावर गणेश मंडळांनी देखावे सादर करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारमुक्त, दहशतवादमुक्त नवभारताचे स्वप्न पाहिले आहे. त्याचप्रकारे पुणेकरांनीही आपल्या स्वप्नातील नवभारताचा संकल्प हाती घ्यावा, असे आवााहनही फडणवीस यांनी केले.

या कार्यक्रमाला महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, आयुक्त कुणाल कुमार, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, खासदार संजय काकडे, आमदार विजय काळे, भीमराव तापकीर, अनिल भोसले यांच्यासह पालिकेचे सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले.

महापौरांनी आपले मनोगत व्यक्त करताना गणेशोत्सव लोकमान्य टिळकांसोबत पाटणकर, बिनीवले आणि भाऊसाहेब रंगारी यांचाही आवर्जून उल्लेख केला आणि त्यांच्या आवाहनाला मान देत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्यासपीठावर जाऊन सत्कार स्वीकारून वाद मिटल्याची अघोषित घोषणा केली. मंडळे आपलीच आहेत, त्यामुळे कायदा पाळताना सर्व गणेशमंडळांसोबत प्रेमाने वागा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलिस आयुक्तांना केली. मात्र याचा अर्थ कसेही वागा, असा अर्थ मंडळांनी घेऊ नये, त्यांनीही कायद्याचे पालन करावे, असा टोलाही मंडळांना लगावला.

गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांची प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्यावरून सुरू असलेल्या वादाला पूर्णविराम देण्यात यावा. गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू करण्यात लोकमान्य टिळकांचे असलेले योगदान कोणालाही नाकारता येणार नाही, असे मत व्यक्त करत महापौर मुक्ता टिळक यांनी बोधचिन्हावरून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.सामाजिक बांधिलकी जपणे हा गणेशोत्सवाचा मुख्य हेतु असून भाऊ रंगारी मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही त्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

भाऊ रंगारींचा उल्लेख टाळला
कार्यक्रमाआधी मुख्यमंत्र्यांची भाऊ रंगारी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. महापौर आणि पालकमंत्र्यांनी या मंडळाचा आपल्या भाषणात उल्लेख केला होता. त्यामुळे मुख्यमंत्रीही त्या विषयावर बोलतील, असा अंदाज दर्शवला जात होता. मात्र त्यांनी लोकमान्य टिळकांच्या कार्याचा गौरव करत भाऊ रंगारी यांचा मात्र उल्लेख टाळला.

मुख्यमंत्र्यांनी टेन्शन घेऊ नये
गेले काही दिवस पुण्याच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षावरून अनेक वाद सुरू आहेत. याबाबत बोलताना पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्र्यांना टेन्शन घेऊ नका, असा सल्ला दिला. पुण्यात वाद, चर्चा होतच असतात, आम्हाला ते लागतच, आम्ही फक्त ते तुमच्या कानावर घालतो, असेही सांगायला ते विसरले नाहीत. दरम्यान त्याआधीच्या आपल्या भाषणात त्यांनी लोकमान्य टिळकांपासून भाऊ रंगारीपर्यंत अनेकांनी योगदान दिल्याचे सांगितले.