सुरेल नाट्यगीतांनी ‘कट्यार’च्याद्वारे जागवल्या आठवणी!

0

पुणे । ‘दिन गेले भजनाविन सारे, घेई छंद मकरंद , सुरत पिया की छिन बिसराये, लागी करेजवा कटार’ यांसह ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकातील एकाहून एक सुरेल अशा अजरामर नाट्यगीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते; संगीत नाटक ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने ‘सुवर्ण महोत्सवी कट्यार : आठवणींसह कथामय नाट्यसंगीत’ या विशेष कार्यक्रमाचे डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध कर सल्लागार विजयकांत कुलकर्णी, सुरेश रानडे आदी उपस्थित होते.

नाटकाशी संबंधित अनेक आठवणी
संजीव मेहंदळे यांनी सादर केलेले ‘बिहागडा’ रागातील ‘या भवनातील गीत पुराणे’, रवींद्र कुलकर्णी यांनी सादर केलेले ‘मुरलीधर श्याम’ हे ‘पुरिया कल्याण’ रागातील नाट्यपद रसिकांची विशेष दाद घेऊन गेले. कल्याणी पोतदार-जोशी यांच्या ‘करात उरली केवळ मुरली’ आणि ‘लागी करेजवा कटार’ या नाट्यपदांबरोबर रसिकांनीही ठेका धरला. कार्यक्रमाचे सूत्रधार प्रसिद्ध अभिनेते विघ्नेश जोशी यांनी नाटकातील अनेक प्रसंग, त्या नाटकाशी संबंधित महत्त्वाच्या आठवणी सांगून कार्यक्रमात अधिकच रंगत आणली.

वादकांची सुरेल साथ
गायिका कल्याणी पोतदार-जोशी, रवींद्र कुलकर्णी, संजीव मेहंदळे, अभय जबडे आणि यश जोशी यांनी सादर केलेल्या नाट्यपदांना रसिकांची भरभरून दाद मिळाली. त्यांना जयराम पोतदार (ऑर्गन), संदीप पवार (तबला), प्रमोद जांभेकर (व्हायोलिन) या वादक कलाकारांनी सुरेल साथ संगत केली.