जळगाव/धुळे: तत्कालीन जळगाव नगरपालिकेतील बहुचर्चित घरकुल घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते आणि माजी आमदार सुरेशदादा जैन यांना 7 वर्षे तुरुंगवास व 100 कोटी रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, तर राज्याचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शनिवारी, धुळे येथील विशेष न्यायालयाच्या न्या. डॉ. सृष्टी नीळकंठ यांनी हा निकाल दिला.
सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर, माजी महापौर प्रदीप रायसोनी, घरकुलचे मक्तेदार आणि खान्देश बिल्डरचे संचालक नाना वाणी, राजा मयूर यांच्यासह एकूण 48 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. विद्यमान आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे देखील या घोटाळ्यातील आरोपींमध्ये आहेत. त्यांनाही शिक्षा झाली असल्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे.
या प्रकरणात 21 वर्षांनंतर निकाल लागला आहे. 1998 मध्ये हा घोटाळा झाला होता. तत्कालीन जळगाव नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी घरकुल योजना राबवण्याचे ठरवले होते. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी 110 कोटींचे कर्ज काढून 11 हजार घरकुले बांधण्याच्या कामास 1999 मध्ये सुरुवात झाली. परंतु, सुरुवातीपासूनच या योजनेत अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात येत होते. सत्ताधार्यांनी मर्जीतील खान्देश बिल्डर्सला हे काम दिले, तसेच नियमबाह्य पद्धतीने ठेकेदाराला सुमारे 26 कोटी रुपये बिनव्याजी आगाऊ (अॅडव्हान्स) देण्यात आल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. सर्वात प्रथम 2001 मध्ये या योजनेतला घोळ समोर आला होता. पालिकेने ज्या जागेवर घरकुले बांधली ती जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. या योजनेसाठी बिगरशेती परवानगी घेण्यात आली नव्हती. ठेकेदाराला विविध प्रकारच्या सवलती देण्यात आल्या होत्या. निविदेमधील काम वेळेत पूर्ण करण्याची मर्यादा ठेकेदाराने पाळली नाही, तरीही कामाला पाच वर्षांपेक्षा जास्त विलंब करणार्या ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले होते.
सुरेशदादा साडेचार वर्षे कारागृहात
माजी सुरेशदादा जैन यांना 11 मार्च 2012 ला अटक झाली होती. ते साडेचार वर्ष कारागृहात होते. त्यानंतर त्यांची अंतरिम जामिनावर सुटका झाली. सुरेशदादा जेवढे दिवस कारागृहात होते, सुमारे तेवढेच दिवस राजा मयूर व नाना वाणी हे देखील कारागृहात होते. गुलाबराव देवकर हे तीन वर्ष कारागृहात होते. प्रदीप रायसोनी पावणेपाच वर्षे कारागृहात होते. सुरेश जैन यांनी चार वर्षे दहा महिन्यांचा कालावधी कारागृहात घालवला आहे. त्यामुळे त्यांच्या सात वर्षांच्या शिक्षेतून हा कालवाधी कमी होईल. मात्र, उर्वरित शिक्षा त्यांना भोगावी लागेल. तसेच गुलाबराव देवकर यांना पाच वर्षे कारवासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
अन्य आरोपींना झालेली शिक्षा
या प्रकरणात राजा मयूर व नाना वाणी यांना प्रत्येकी 7 वर्षे तुरुंगवास आणि 40 कोटी रुपये दंड, प्रदीप रायसोनी 7 वर्षे तुरुंगवास आणि 10 लाख रुपये दंड, तत्कालीन मुख्याधिकारी पी. डी. काळे व इतर नगरसेवक यांना पाच वर्षे तुरुंगवास आणि 5 लाख रुपये दंड, गुलाबराव देवकर 5 वर्षे तुरुंगवास आणि 5 लाख रुपये दंड झाला आहे.
आरोपी क्रमांक 6 ते 17 (महेंद्र सपकाळे, अशोक सपकाळे, चुडामण पाटील, अफजल खान रऊफ खान पटवे, शिवचरण ढंडोरे, आ. चंद्रकांत सोनवणे, सरस्वती कोळी, चंद्रकांत उर्फ आबा कापसे, विजय रामदास वाणी, अलका राणे, पुष्पा पाटील, डिगंबर वाणी) आणि आरोपी क्रमांक 43 ते 52 (अलका लढ्ढा, मुमताज बी खान, सुनंदा चांदेलकर, मीना मंधाण, रेखा सोनवणे, भागीरथीबाई सोनवणे, मीना वाणी, पुष्पलता अत्तरदे, विजय कोल्हे, सदाशिव ढेकळे) यांना 4 वर्षे तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड.
आरोपी क्रमांक 16 पुष्पा पाटील यांना 3 वर्षे तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड सुनावण्यात आला आहे. पुष्पा पाटील यांनी सायंकाळी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तो मंजूर झाला आहे. शिक्षा सुनावताना दोन भाग करण्यात आले. काही नगरसेवकांना 5 वर्षे तुरुंगवास व 5 लाख रुपये दंड तर काहींना 4 वर्षे तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड झाला आहे.
सिंधू कोल्हेंचा खटला स्वतंत्रपणे चालणार
माफीच्या साक्षीदार सिंधू कोल्हे यांचा खटला स्वतंत्रपणे चालणार असल्याची माहिती असे सांगण्यात आले.
अण्णा हजारेंनी आवाज उठविला होता
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सन 2004 मध्ये जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणाविषयी आवाज उठवल्यानंतर न्यायमूर्ती पी. बी. सावंत आयोग, सुधाकर जोशी आयोग, सोनी आयोग या तीन आयोगांमार्फत जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती.
खंडपीठ, सुप्रीम कोर्टात आव्हान शक्य
आरोपींची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना धुळे जिल्हा कारागृहात नेण्यात आले. 3 वर्षांपेक्षा अधिक तुरुंगवास आणि आर्थिक दंड झालेल्या आरोपींना त्यांच्या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात, त्यानंतर सुप्रीम कोर्टात आव्हान देता
येणार आहे.
मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. गेडाम यांनी
फेब्रुवारी 2006 मध्ये दाखल केली फिर्याद
याप्रकरणी जळगाव महापालिकेचे तत्कालिन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी 3 फेब्रुवारी 2006 रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. सुमारे 45 कोटींच्या गैरव्यवहाराबाबत 93 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशीअंती 57 पैकी 53 आरोपींवर दोषारोप ठेवण्यात आले होते. यामध्ये माजी आमदार सुरेशदादा जैन, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर प्रदीप रायसोनी, खान्देश बिल्डरचे संचालक मेजर नाना वाणी, राजा मयूर यांच्यासह माजी पदाधिकारी, नगरसेवक, तत्कालीन अधिकारी यांचा समावेश होता.