बीड : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आष्टीत राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित नेते माजी मंत्री सुरेश धस यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यामुळे सुरेश धस यांना राष्ट्रवादीने निलंबित केले होते. त्यानंतर धस हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे.
राष्ट्रवादीचे दोन ज्येष्ठ नेतेही जाळ्यात
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते सुद्धा भाजपसोबत काम करण्यास इच्छूक असल्याचा गौप्यस्फोटही पंकजा मुंडे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आष्टी येथे सुरेश धस यांनी कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला पंकजा मुंडेंनीही हजेरी लावली. सुरेश धस हे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी दिवसभर चर्चा असतानाच पंकजा मुंडे यांनी त्यांच्या प्रवेशाची चिंता कार्यकर्त्यांनी करू नये, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
योग्यवेळी उत्तर देऊ
माझ्या भाजप प्रवेशावर जुन्या पक्षातीलच तथाकथित नेते हे तारखा सांगत सुटले आहेत. आपल्यावर जे आरोप करत आहेत, त्यांना योग्यवेळी त्यांच्याच शैलीत उत्तर देऊ, असे म्हणत सुरेश धस यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना इशारा दिला.
विरोधकांवर निशाणा
तर दुसरीकडे संत भगवान बाबा यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त बीड जिल्ह्यातील सावरगावात बोलतांना ना. पंकजा मुंडे यांनी आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे सांगून मला अडचणीत आणण्यासाठी घाणेरडं राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे, राजकारणात मी सध्या कुठे उभी आहे, कसं पुढे जायचं हे मला माहीती आहे. पण अडचणीत आणण्यासाठी घाणेरडं राजकारण केलं जात आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.