सुलवाडे-जामफळ कनोली प्रकल्पास मंजूरी

0

धुळे । सुलवाडे-जामफळ कनोली प्रकल्पाचे जनतेचे स्वप्न पुर्णत्वास येत आहे. या योजनेला स्पेशल प्रोजेक्ट म्हणून पंतप्रधान कार्यालयाने मंजुरी दिली आहे. प्रकल्पासाठी नाबार्डच्या माध्यमातून कर्जाची तरतुदही करण्यात आली असून डिसेंबर 2018 मध्ये हा प्रकल्प पुर्णत्वास येईल असे संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सुलवाडे प्रकल्पामुळे धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातील गावांची तहान भागणार आहे. त्याच बरोबर येथील शेतकर्‍यांच्या शेतात पाणी पोहचणार असल्याने शेतकरी सुजलाम- सुफलाम होणार आहे. 1995 साली युती सरकार असतांना शिंदखेडा तालुक्यात तापी नदीवर सुलवाडे बॅरेज व सारंगखेडा बॅरेज बांधण्यात आले. ह्या बॅरेजसमुळे तापी नदीत प्रचंड पाणीसाठा अडविण्यात आला. अगदी उन्हाळ्यात देखील तापी नदी काठोकाठ 30 ते 40 कि.मी. लांब पर्यंत भरलेली असते.

संपूर्ण देशात 99 प्रकल्प
पाणी शेतकर्‍यांच्या शेतीपर्यंत नेण्यासाठी व धुळे शिंदखेडा तालुक्यातील 100 गावांसाठी पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी सुलवाडे जामफळ लिफ्ट इरिगेशन योजना आखण्यात आली होती. परंतु 20 वर्षापासून ही योजना प्रलंबित आहे व हे सगळे पाणी समुद्रात वाहून जात होते. सन 2014 साली मी खासदार झालो व ठरविले कि, कुठल्याही परिस्थितीत ही योजना मंजूर करून निधीची उपलब्धता करून हा प्रकल्प पूर्ण करावा परंतु त्यासाठी बर्‍याच तांत्रिक मान्यता मिळविणे क्रमप्राप्त होते. राज्याकडून स्टेट फायनान्स क्लीअरन्स मान्यता जुलै 2016 साली मिळविली.स्टेट इन्व्हेस्टमेंट क्लीअरन्स ही मान्यता फेब्रुवारी 2017 मध्ये मिळाली. संपूर्ण देशाचे 99 प्रकल्प मंजूर केलेले आहेत. त्यावर आधी पैसे खर्च करून मग इतर योजनेला हात लावावा असा निर्णय केंद्राने केलेला होता. महाराष्ट्रात असे 26 प्रकल्प होते त्यांना केंद्र सरकार निधी देऊन पूर्ण करणात आहेत. त्यात सुलवाडे जामफळचा समावेश नव्हता त्यामुळे आता प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये जरी समावेश केला तरी आधीचे 99 प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय सुलवाडे जामफळला निधी देऊ शकत नाही.