सुलवाडे बॅरेजमधून तापीकाठच्या गावांना पाणी

0

शिंदखेडा । तापी काठावरील नेवाडे, अक्कठसे, अमळधे, वरपाडे, आच्छी, हिसपूर या गावातील ग्रामस्थांनी केलेल्या मागणीमुळे शासनाने अखेर सुलवाडे बॅरेजमधून दोन दशलक्ष घणफुट पाणी सोडले. यामुळे पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, रविवार, 3 रोजी तापी नदीपात्रात माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आले.

तहसिलदारांना दिले होते निवेदन
तालुक्यातील तापी काठावरील गावांना मे महिन्यापासून भिषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होेते. यामुळे नेवाडे, अक्कडसे, सोनेवाडी, वरपाडे, आच्छी, हिसपूर या गावांतील शेतकर्‍यांनी 19 मे रोजी तहसिलदार यांच्याकडे तात्काळ पाणी सोडण्याची मागणी केली होती. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात सुलवाडे बॅरेजमधून पाणी सोडल्यास टंचाई दूर होईल, असे नमुद करण्यात आले होते. दरम्यान, या मागणीची दखल घेत माजी आ. रामकृष्ण पाटील यांनीही जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करुन पाणी सोडण्याची मागणी केली होती. बॅरेजमधून पाणी सोडतेवेळी अमळधेचे सरपंच विरेंद्र पवार, मनोहर पवार, अ‍ॅड. वसंत पवार, सोमेवाडीचे विनोद पाटील, नेवाडेचे रमेश पवार, ज्ञानेश्‍वर पाटील, रावसाहेब पवार, झेंडू खैरनार, जयवंत साळुंखे, दीपक पाटील, चेतन सोनवणे, कनिष्ठ अभियंता यु.डी. अन्वेकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के.टी. सुर्यवंशी, उपअभियंता डी.टी. बडगुजर आदी उपस्थित होते.