सुवर्णनगरीतला जादूगार, लुटारूंची टोळी आणि अंधभक्त

0

अमित महाबळ:

गोष्ट बरीच जुनी आहे. जादूगार, लुटारूंची टोळी आणि अंधभक्त. यामध्ये एक राजाही आहे. आता राजा म्हटले म्हणजे त्याला नाव हे आलेच. आपण ‘सटकफटक’ म्हणू या. बरे हा राजा कसा होता तर जंगलातल्या वृद्ध झालेल्या वाघासारखा. आब तोच पण पूर्वीची ताकद न राहिलेला. शत्रूपक्षाने या राजाविरोधात कट रचला. त्यांना त्याची सत्ता उलथावून ‘सुवर्णनगरी’ ताब्यात घ्यायची होती. त्यांच्या मदतीला एक जादूगार होता. याला म्हणे पैसे उडवायची भन्नाट कला अवगत होती. याच्यामुळे जनता संमोहित व्हायची. मग हा जादूगार जसे सांगेल, तसे वागायची. पूर्वी असल्या जादू होत्या म्हणे. सुवर्णनगरीचा राजा वार्धक्याकडे झुकलेला, त्याचे सैन्यही गाफिल. आजूबाजूला बरेच खूशमस्करे जमलेले. जादूगाराने आपले जाळे विणायला सुरुवात केली. पहिल्यांदा राजाचे सैन्य फोडले. त्यांना आपल्यात आणले. त्यासाठी आमिषे दाखवली. राजा पाहतच राहिला पण करतो काय? लढण्यासाठी पदरी सैन्य नाही. जे उरले-सुरले होते त्यांच्या भरवशावर राज्य किती दिवस टिकणार? राजाही काळजीत पडला. इकडे जादूगाराने संधी साधली आणि सुवर्णनगरीत हळूच शिरकाव केला. याचे एकच काम; पैसा उडवून दाखवायचा. ‘हजारऽऽ….’ ‘कोटीऽऽऽ…’ जनता पुरती वेडी व्हायची. हुर्रे करत टाळ्या पिटायची. जनतेतून आवाज यायचा – आणखीऽऽ, आणखीऽऽऽ. मग काय? या जादूगाराचा डाव रंगात यायचा. घ्या..घ्या.. म्हणत तोही मुक्तहस्ते उधळण करायचा. संमोहनच असायचे ते. जनतेला पैशाचा पाऊस पडलेला दिसायचा पण प्रत्यक्षात शब्द फेकलेले असायचे. जनता भुलायची. त्यांनी चक्क राजालाच हाकलून लावले. राजानेही सुवर्णनगरीचे नाव टाकले.

‘सात बेटां’च्या दुनियेत बस्तान हलवले. जादूगार एकदम खूश. सटकफटक राजाकडून फुटून आलल्यांपैकी कुणी प्रधान, तर कुणी वजीर, सेनापती होणार असल्याची स्वप्ने रंगवायला लागला. जादूगाराची मोहीम फत्ते झाली. सुवर्णनगरी ताब्यात आली. त्याने पाचसात कारभारी जमा करत त्यांच्याकडे राज्यकारभार सोपवला. शेवटी जादूगारच तो. एका जागी थोडीच टिकणार. गावोगावी पैसे उडवायची जादू दाखवत फिरला. इकडे सुवर्णनगरीची पार रया गेली. सुरत भकास झाली. डोक्यावर राजाच नव्हता. विचारणारे कोणी नव्हते. मग काय? ते जे काही कारभारी होते त्यांनी मनमानी सुरू केली. एक ना धड भाराभार चिंध्या करून ठेवल्या. सुवर्णनगरीतले रस्ते खड्ड्यात गेले. त्यावरील खड्डे मोजवेनासे झालेे. कटीभागाला दणके बसू लागल्यावर जनतेचे खाड्कन डोळे उघडले. त्यांना जादूगाराची अंधभक्ती नडली. पण करतात काय बिच्चारे, जे व्हायचे ते घडून गेलेले. रस्ते नसलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजू लागले. जनतेच्या तोंडचे पाणी मधूनच पळू लागे. कारभार्‍यांचेही आपापसात जमेनासे झाले. लुटारूंनी डाव साधला. सुवर्णनगरीचा खजिना रिता केला. सोन्याचे लोखंड करू टाकले. जनतेला वार्‍यावर सोडले. ही गोष्ट सहज आठवली. कारण, परवाच जनतेच्या तोंडून ऐकले की, भाऊ…भाऊ म्हणता म्हणता आमचाच मामा झाला हो. वरच्या गोष्टीमधला संदेश एवढाच आहे की, गेलेली वेळ परत आणता येत नाही. हेही तितकेच खरे!