नवी दिल्ली । माझी दोन्ही मुले बरीच लहान आहेत. गोल्डकोस्टमध्ये मी पदकासाठी झुंजत असताना ते माझ्या पत्नीसमवेत स्टेडियममध्ये होते आणि गो फॉर गोल्डच्या घोषणा त्यांनीही दिल्या. आजही माझे सुवर्णपदक त्यांच्याकडेच आहे, असे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णजेता कुस्तीगीर सुशीलकुमार मायदेशी परतल्यानंतर म्हणाला. मागील दोन वर्षांत अनेक वादांच्या केंद्रस्थानी राहिलेला सुशील यंदा या सुवर्णपदकाने अर्थातच सुखावला असून, या यशाचे श्रेय त्याने प्रामुख्याने आपल्या कुटुंबीयांना दिले आहे. प्रारंभी, रिओ ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान, उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेल्या नरसिंग यादवने या प्रकरणात सुशीलच्या सहकार्यांचा हात असल्याचा आरोप केला तर प्रवीण राणाने आपल्या समर्थकांना सुशीलच्या गटाने मारहाण केल्याचा दावा केला. सुशीलकुमारने मात्र हे दोन्ही आरोप यावेळी खोडून काढले. आपल्याला या वादातून बाहेर पडत नव्याने कारकिर्दीला सुरुवात करायची आहे, असे सुशीलने वारंवार सांगितले आणि आताही त्याने याचाच पुनरुच्चार केला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे मला मागील साधारणपणे दोन वर्षांच्या कालावधीत फारशा स्पर्धांमध्ये सहभागी होता आले नव्हते. पण, पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतरच मॅटवर उतरायचे, हे मी निश्चित केले होते. त्यामुळे, मला पुनरागमनासाठी थोडा अवधी घ्यावा लागला. पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतर मी राष्ट्रकुल स्पर्धेत उतरू शकलो, असे त्याने पुढे स्पष्ट केले.
नरसिंग व राणा हे दोघेही माझ्यासाठी लहान भावाप्रमाणे आहेत. ते माझे कनिष्ठ सहकारी आहेत. तसे पाहता, मला वादात राहायचेच नव्हते. पण, प्रत्येक वेळी त्यात मला ओढले गेले. मी स्वतः काल काय घडले, यात रमण्याऐवजी भविष्यावर लक्ष केंद्रित करून असतो. अर्थात, कष्ट उपसणे खूप महत्त्वाचे असते आणि त्यामुळेच आपल्याला सन्मान लाभतो, याची कनिष्ठांनी जाणीव ठेवायला हवी, असा सल्ला सुशीलने या उभयतांना यावेळी दिला. सध्या आपण आशियाई स्पर्धेसाठी तयारी करत असून त्यानंतरच ऑलिम्पिकची वाटचाल स्पष्ट होईल, असे सुशीलने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. आशियाई स्पर्धेत इंडोनेशियन प्रतिस्पर्ध्यांचा बीमोड करण्यासाठी मी रणनीती आखत आहे, याचाही त्याने उल्लेख केला.
ज्येष्ठांचे आशीर्वाद महत्त्वाचे
मला स्वतःला फक्त मेहनत करण्यावरच अधिक विश्वास आहे. माझे प्रशिक्षक सतपाल व बाबा रामदेव यांचे आशीर्वादही माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. रामदेव बाबा हरिद्वारमध्ये भेटले, तो माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. या सर्व बाबींमुळे निश्चितच आत्मविश्वास आणखी दृढ होतो, असे या दिग्गज मल्लाने शेवटी नमूद केले.