अमृतसर । शीख धर्मात सर्वात पवित्र म्हणून ओळखल्या जाणार्या अमृतसरच्या सुवर्णमंदिरात मंगळवारी पुन्हा एकदा खलिस्तान चळवळीच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली आणि देशविरोधी नारे देण्यात आले. 33 वर्षांपूर्वी, 6 जून 1984 रोजी ऑपरेशन ब्लू स्टार अंतर्गत सुवर्णमंदिरात लष्कर घुसवून दहशतवाद्यांचा बिमोड करण्यात आला होता. यावेळी जरनेलसिंह भिंदरनवालेच्या नेतृत्वात शीख धर्मीयांसाठी वेगळ्या पंजाबची मागणी करण्यासाठी खलिस्तान चळवळ उभारण्यात आली होती. खलिस्तानसाठी भारत सरकारविरोधात बंड पुकारणारे हजारो दशहतवादी भिंद्रनवालेच्या आश्रयानं हत्यारांसह सुवर्ण मंदिरात तळ ठोकून होते. खलिस्तान चळवळ मोडून काढायची असेल, तर भिंद्रनवालेला बाहेर काढून त्याला अटक करणे अत्यावश्यक होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टारची परवानगी दिली. पाच आणि सहा जून 1984 ला लष्करानं कारवाई केली ज्यामध्ये भिंदरनवाले मारला गेला. मोठ्याप्रमाणात रक्तपात झाला. सुवर्ण मंदिराचेही मोठे नुकसान झाले. या कारवाईत सुवर्ण मंदिरात लपलेल्या सुमारे 200 दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. या घटनेला मंगळवारी 33 वर्षे पूर्ण झाली. याचनिमित्त सुवर्णमंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या वेळी काही खलिस्तान समर्थकांनी खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या.
दोन वर्षांपासून तणाव
याआधी दोन वर्षांपूर्वी दरबार साहिबमध्ये असाच गोंधळ निर्माण होऊन त्याला हिंसक वळण लागले होते. त्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यावेळी पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त ठेवला होता. शहारातील प्रत्येक नाक्यांवर, चौकांमध्ये पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले होते.
माइक, स्पिकर फोडले
यावेळी ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना हुतात्मा ठरवून त्यांच्यासाठी संदेश वाचन करण्यात आले. हा संदेश अकाल तख्त साहिबचे मूख्य जत्थेदार सिंह साहीब ग्यानी गुरबचन सिंग वाचतील असे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने स्पष्ट केले होते. मात्र खालसासारख्या कर्मठ संघटनांनी एसजीपीसीचा हा निर्णय मान्य केला नाही. दुसर्या जत्थेदारांनी संदेश वाचनास सुरुवात करताच माईक आणि स्पिकरची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर खलिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.
जत्थेदाराबाबत आक्षेप
या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला, 5 जून रोजी अमृतसरमध्ये एक रॅली काढण्यात आली होती. ही रॅली काढणार्या खालसा दलाचे प्रमुख हरपाल सिंग चीमा आणि प्रवक्ते कंवर पाल सिंग बिट्टू यांनी जत्थेदार गुरबचन सिंह यांना शीख धर्मीयांमध्ये फारसे महत्व नसल्याचे स्पष्ट केले होते. कंवर पाल सिंग बिट्टू यांनी सांगितले की, डेरा सिरसा प्रकरणात गुरबचान सिंह यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याला किंवा संदेश वाचनाला महत्व रहात नाही. त्यामुळे त्यांच्या संदेशवाहनास विरोध करणार आहोत, हे आधीच सांगितले होते.