चाळीसगाव (गणेश पवार) । प्रवाशांना सुविधा द्यावयाची इच्छा असताना देखील महामंडळाकडून सहकार्य मिळत नसल्याने सुविधा देता येत नसल्याची खंत एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांनी व्यक्त केली आहे. आमच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून तोडगा काढावा, तसेच मागण्या मान्य होईपर्यंत एसटीचा अघोषित संप सुरू राहणार असल्याची माहिती एसटी संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिली आहे. दरम्यान, या संपाच्या पार्श्वभूमीवर बसेसची माहिती घेतली असता अनेक बसेसच दयनिय अवस्था झाली असून कर्मचार्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विविध मागण्यासाठी एस टी कर्मचार्यांनी दि 8 रोजी मध्यरात्री पासून अचानक अघोषित संप पुकारल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मात्र कर्मचारीही अनेक समस्यांनी त्रस्त असून त्यांच्या मागण्यांचा विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अन्य राज्यात सातवा वेतन
राज्याचे परीवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पगारवाढ झाल्याचे बॅनर प्रत्येक बस स्टँड ला लावले. त्यात दाखविल्या प्रमाणे कुठलीही वेतन वाढ झाली नाही, ती एक प्रकारची दिशाभूल असून याबाबत बॅनर बाजीवर एवढया मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याची गरज काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आज महामंडळ प्रवाशांकडुन 17 .5 टक्के करापोटी घेते. राज्यात उत्पन्नाच्या बाबतीत सर्वात जास्त महसूल एसटी महामंडळा कडुन मिळतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न व प्रवाशांकडून कर घेऊन देखील एसटी कर्मचार्याची वेतन वाढ होत नाही. महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत इतर राज्यांमध्ये प्रवासी कर 5 टक्के आहे. गुजरात, कर्नाटक, तामिळनाडु, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ या राज्यांमध्ये एसटी कर्मचार्यांना केंद्रदाच्या कर्मचार्यांप्रमाणे 7 वा वेतन आयोग लागू झाला आहे. त्या धरती वर एसटी कर्मचार्यांची पगारवाढ हवी होती, अशी माहिती कर्मचार्यांनी दिली आहे.
कर्मचार्यांचा वाढतोय ताण: राज्यभरात दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे आणि 10 वर्ष आयुष्य असलेल्या बसेस बाद होऊन भंगारात जात असल्याने त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. प्रवासी जास्त बसेस कमी अशी परिस्थिती आहे. नव्याने बस नाही. त्यामुळे याचा परीणाम एसटी कर्मचार्यांवर होऊन दिवसेंदिवस त्याचा ताण वाढत आहे. त्यातच अशा प्रकारची पगार वाढ सांगून एक प्रकारची कर्मचार्यांची थट्टा केल्याचे बोलले जात असून राज्याला सर्वात रोकड महसूल एसटी महामंडळा कडून मिळतो. तरी देखील राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये एसटी महामंडळासाठी तरतूद केली जात नाही. त्यामुळे एसटी तोट्यात असल्याचे दिसत आहे.
बस बांधणीचे कामच बंद
दिवाळीमध्ये कर्मचार्यांनी संप केला होता त्यात 1 एप्रिल 2016 च्या मुळवेतनापेक्षा 3500 रुपये आधिक वाढ व त्याला गुणीला 2 .57 टक्के वेतन वाढ व्हायला पाहिजे होती, मात्र तसे झाले नाही. एसटी बसेसमध्ये प्रवाशांना 33 प्रकारच्या सवलती मिळतात, मात्र गेल्या 3 वर्षांपासून एसटी महामंडळाने एक ही लाल बस तयार केली नाही. औरंगाबाद, पुणे, नागपूर येथे एसटी महामंडळाचे बस बांधणीचे कारखाने आहेत. एसटी महामंडळाने चेचीस खरेदी करून या कारखान्यामध्ये दिल्यास तेथे लाल बसचे बांधणी चे काम होते, मात्र गेल्या 3 वर्षांपासून महामंडळाकडून 1 ही बसेसची चेसीस न गेल्याने बस बांधणीचे कामबंद आहे.
65 बसेसला स्टेपनीच नाही
चाळीसगाव बसआगाराची अवस्था बिकट असून ज्या तालुक्याची जीवनवाहिनी म्हणून बस ओळखली जाते त्या बसेसची अवस्था बिकट झाली आहे. 80 बसेस पैकी चक्क 65 बसला स्टेपनी नाही आणि त्यात विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यांपासून टायरचा पुरवठा झाला नसल्याने प्रवाशांना पाहिजे तशी सुविधा देता येत नसल्याचे कर्मचार्यांनी बोलून दाखविले आहे. तालुक्यात एखाद्या गावात बस घेऊन गेले असता टायर पंक्चर झाल्यास अतिरिक्त टायर व स्टेपनीच नसल्याने नाईलाजास्तव बस तेथेच थांबवावी लागते म्हणून प्रवाशांना देखील त्याच ठिकाणी ताटकळत थांबवावे लागते, अशा अनेक समस्या एसटी कर्मचार्यांच्या आहे. त्या समस्या देखील सोडविणे गरजेचे आहे, आमच्या मागण्यासाठी अघोषित बंद केला यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून तोडगा काढावा व आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात मागण्या पूर्ण झाल्याशिवाय एसटी कर्मचारी कामावर येणार नाहीत, अशी माहिती मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे डेपो अध्यक्ष रत्नाकर साळुंखे यांनी दिली आहे.