सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात पार्थ पवारांची ‘एन्ट्री’

0

मुंबई: बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये घराणेशाहीचा वाद पुढे आला. सुशांतसिंग राजपूत आत्महत्येची चौकशी व्हावी अशी मागणी झाल्यानंतर मुंबई पोलीस याप्रकरणी चौकशी करीत आहे. अनेक कलाकार, दिग्दर्शकांची याप्रकरणी चौकशी झाली आहे. बॉलीवूडमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप देखील झाले. मात्र आता या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी एन्ट्री घेतली आहे. पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या युवकांसाठी सुशांत एक आयडॉल होता. अनेक चाहत्यांनी याबाबत मला ईमेल्स, फोन, मेसेज केले, यात बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेशमधील युवकांनी मला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले. सुशांतला न्याय मिळवून द्यावा या युवकांच्या भावना योग्य आहेत असे पार्थ पवार यांनी निवेदनात म्हटले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्यरितीने तपास करत आहेत. मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे, पण सुशांतला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणात सीबीआयच्या तपासाची शिफारस करावी अशी मागणी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली आहे.

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर खान, कपूर घराण्यावर टीका झाली. करण जोहर, सलमान खानविरोधात चाहत्यांनी कोर्टात धाव घेतली होती.

करण जोहरची होणार चौकशी
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यानंतर आता मुंबई पोलीस निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याची चौकशी करणार आहेत. या आठवड्यात करण जोहरचा जबाब नोंदवला जाणार आहे. तसेच, याप्रकरणी आज धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांची चौकशी होणार आहे.