सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

0

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी महत्त्वाचा निकाल दिला. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी होत होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे. मुंबई पोलीस या प्रकरणी तपास करत होते. या प्रकरणाचे सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवून तपासात सहकार्य करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिला आहे. न्यायालयाच्या या निकालावर सुशांतच्या नातेवाईकांनी आणि सीबीआय चौकशीच्या मागणी करणाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला.पाटणा येथे दाखल झालेला एफआयआर सर्वसमावेशक असल्याचे सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगितले. सुशांतच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदविण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही खटल्यांचा तपास सीबीआयने करावा असेही निर्देश कोर्टाने दिले.