माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची स्पष्टोक्ती ; भुसावळात लेवा पाटीदार युवक महासंघाचे परीचय संमेलन
भुसावळ- लेवा समाजात मुलींचे प्रमाण घटले असून ही बाब चिंताजनक असून मुलींचा टक्का वाढण्याची गरज आहे. लेवा समाज सुशिक्षीत, उच्चशिक्षीत झाला असलातरी सुशिक्षीत समाजातील घटस्फोटाचे प्रमाण चिंताजनक आहे. पूर्वी वधू-वर परीचय सूचीत अपवादात्मक घटस्फोटातांची नावे असायची आता मात्र नावे वाढली असून ही बाब समाजासाठी धोक्याची घंटा असल्याची स्पष्टोक्ती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केली. शहरातील संतोषी माता सभागृहात रविवारी अखिल भारतील लेवा पाटीदार महासंघातर्फे झालेल्या वधू-वर परीचय मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोरगाव लेवा पंचायतीचे कुटूंबनायक रमेश विठू पाटील होते. दरम्यान, मेळाव्यात परीचय पुस्तिकेचे प्रकाशनकरण्यात आले तर 34 मुली आणि 26 मुलांनी आपला परीचय दिला.
मोबाईलमुळे वाढला तणाव -नाथाभाऊ
खडसे म्हणाले की, मेळाव्याच्या आयोजकांनी इच्छूक वधू-वरांना व्यासपीठावर येवून परीचय देण्यास संकोच वाटत असल्यास त्यांनी बसल्या जागेवरूनच परीचय देण्याचे सूचवले असलेतरी आपण लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेलांचे वंशज आहोत त्यामुळे जे बोलायचे ते स्पष्टपणे बोलले पाहिजे व आपली भूमिका मांडली पाहिजे, असे ते म्हणाले. आयुष्याचा जोडीदार निवडणे भाजीपाला खरेदी करण्याइतके सोपे मात्र सर्व बाबी तपासूनच जोडीदार निवडा, असे सांगत पूर्वी मुलीची आई-वडीलांशी भेट होत नव्हती मात्र आता मोबाईल आल्यामुळे तातडीने संवाद साधता येतो मात्र मोबाईलमुळे संबंधात तणाव वाढला असून घटस्फोटाचे कारणही मोबाईल ठरत आहे. आपल्याला कॉन्सिलींगची गरज आहे त्यामुळे किमान घटस्फोट टळतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सुप्रीम कोर्टाला मी धन्यवाद देतो कारण त्यांनी डीजेवर बंदी आणली त्यामुळे समाजातील वायफळ होणार्या खर्चाला आळा बसल्याचे ते म्हणाले.
व्यासपीठावर यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हरीभाऊ जावळे, जळगावच्या महापौर सीमा भोळे, नगराध्यक्ष रमण भोळे, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, पंचायत समितीच्या सभापती प्रीती पाटील, माजी आमदार नीळकंठ फालक, अखिल भारतीय लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अॅड.प्रकाश पाटील, देवेंद्र वाणी, दिनेश भंगाळे, नगरसेवक मुकेश पाटील, मंगला पाटील, अमोल इंगळे, माजी नगरसेवक परीक्षीत बर्हाटे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
लग्नातील अनाठायी खर्च टाळावा -कुटुंबनायक
विवाह जोडताना मुलामुलींच्या कुंडलीतील गुण ब्राह्मणांकडे जावून पाहण्यापेक्षा अंगभुत गुण पाहणे अपेक्षित आहे. लग्न कार्यामध्ये बँड लावून अधिक खर्च करू नका तसेच मुलींना लग्नात नाचण्यासाठी अंकूश लावा, असे आवाहन यावेळी कुटूंबनायक रमेश पाटील यांनी केले. यासह संबंध जोडताना परीपूर्ण शहानिशा करावी. लग्नात अधिक खर्च करुन इतर लोक आपल्या जिवावर पोट भरत आहे. आपल्या समाजातील लोकांना शेती विकावी लागत आहे यामुळे बडेजावपणा टाळा असे पोटतिडकीचे आवाहनही त्यांनी केले.
आई, वडीलांना मान द्या -आमदार जावळे
विवाहानंतर मुलामुलींच्या संसारातील अतिरिक्त हस्तक्षेप प्रकर्षाने टाळला पाहिजे. विवाहानंतरच्या काळात एकमेकांचे राग, लोभ, रुसवे, फुगवे समजून घेतले पाहिजे. अपेक्षीत निवड झाल्याने चांगले जिवन जगा. यासह लग्नातील अनावश्यक खर्च टाळायला हवे, असे आमदार हरीभाऊ जावळे म्हणाले.
प्रेमविवाहांचे प्रमाण वाढतेय -नगराध्यक्ष
लेवा समाजाचा वधू-वर परीचय मेळाव्याच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले असून समाजात प्रेमविवाहाचे प्रमाण वाढत असून हे करताना सामाजिक स्तर, शिक्षण आदींना विचारात घेतले पाहिजे, अन्यथा अल्पावधीत हे प्रेमविवाह भंग होतात, अशी अनेक उदाहरणे सध्या समोर आल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले.
मेळाव्यासाठी यांनी घेतले परीश्रम
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शहराध्यक्ष देवा वाणी, उपजिल्हाप्रमुख शाम भारंबे, रुपेश चौधरी, कोमल चौधरी, कल्पेश पाटील, निलेश राणे, निरज किरंगे, अमोल भंगाळे, राहुल नेमाडे, संकल्प वाणी, विनय चौधरी, पवन फालक, मनोज जावळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.