नवी दिल्ली । जपानची राजधानी टोकियोमध्ये 2020 मध्ये होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अखिल भारतीय कुस्ती महासंघाने टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप्स) योजेनेसाठी क्रीडा मंत्रालयाला पाठवलेल्या यादीतून चार ऑलिम्पिक पदक विजेत्यांना वगळले आहे. या यादीत दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारा सुशीलकुमार, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त, राष्ट्रकुल पदक विजेत्या गीता आणि बबिता फोगटचा समावेश असल्यामुळे या कुस्तीपटूंकडून कुस्ती महासंघाला ऑलिम्पिक पदकाची अपेक्शा नसल्याचे समजले जात आहे. या कुस्तीपटूंना वगळण्याची कारणेही महासंघाने दिली आहेत. सुशील आता राष्ट्रीय पर्यवेक्शक झाला असल्यामुळे तो निवृत्त होण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय गेली दोन एक वर्ष सुशिलने भारताचे प्रतिनिधीत्व केलेले नाही. याशिवाय तो निवड चाचणीसाठीही हजर नव्हता म्हणून त्याचा समावेश केला नसल्याचे कुस्ती महासंघाच्या एका पदाधिकार्याने सांगितले.
यांच्या नावाचा समावेश
टॉप्ससाठी कुस्ती महासंघाने पाठवलेल्या यादीत पुरुषांच्या फ्री स्टाईल प्रकारात संदीप तोमर, उत्कर्ष काळे, अमित दाहिया, श्रावण, बजरंग, अमित धनकड आणि सत्यव्रत कादियान यांचा तर महिलांमध्ये रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती साक्शी मलिक, विनेश फोगट,रितु फोगट, दिव्या काकरान आणि ज्योती यांचा समावेश आहे. हे सर्व कुस्तीपटू सोनीपत येथे होणार्या जागतिक अजिंक्यपद निवड चाचणी दरम्यान आपापल्या गटात पात्रता फेरीचा निकष पूर्ण करतील अशी कुस्ती महासंघाच्या पदाधिकार्यांना आशा आहे.
योगेश्वर, बबिताचे दुर्लक्ष
योगेश्वर दत्त विवाहानंतर राष्ट्रीय शिबीरात सहभागी झालेला नाही. दुसरीकडे गीता आणि बबीताला वारंवार सांगूनही त्या दोघीही लखनऊ येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शिबीरात सहभागी झालेल्या नाहीत. या दोघी त्यांच्या वडीलांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असल्याचे बोलले जाते. दरम्यान टोकियो ऑलिम्पिकसाठी नवीन चेहर्यांना संधी देण्याचे धोरण कुस्ती महासंघाने स्विकारले आहे.