सुसंवादाने जीवन सुधारु शकते

0

जळगाव । संवाद हे दुधारी तलवार आहे. याचा योग्य वापर केला नाही तर नुकासन होवू शकते. त्याच प्रमाणे संवादाचा योग्य वापर केल्यास एखाद्याचे जीवन सुधारू शकते असे व्यवस्थापन प्रशिक्षक नीलेश सुराणा (औरंगाबाद) यांनी सुसंवादाचे महत्व पटवून देतांना सांगितले. जैन इंटरनॅशनल ट्रेंड ऑर्गनायझेशनतर्फे आयोजीत ’मिरॅकल इन बिझिनेस थ्रू कम्युनिकेशन’ या विषयावर कार्यशाळेत ते बोलत होते. याप्रसंगी संघपती दलुभाऊ जैन, माजी मंत्री सुरेश जैन, माजी खासदार ईश्‍वरलाल जैन, सुगनचंदजी राका, प्रवीणजी पगारिया,मनोज सुराणा, राजेश जैन, अनिल कांकरिया, प्रवीण चोपडा, पारस राका, अविनाश जैन, प्रवीण कांकरिया, हेमंत कोठार आदी उपस्थित होते. जळगाव जितो चॅप्टर मार्फत या कार्यशाळेचे आयोजन कांताई सभागृहात रविवारी करण्यात आले होते.

मोबाईल कल्चरमुळे परस्परातील संवाद हरवत चालला आहे
सुराणा पुढे म्हणाले की, आधुनिक काळात संवादाच्या स्वरूपात बदल होत आहे. मीडीया संवाद आल्यापासून सुसंवादमध्ये बदल घडत आहे. फेसबुक, व्हॉटस् अप च्या आगमनाने बहुतांस संवाद त्यावरच साधला जात आहे. मोबाईल कम्युनिकेशन वाईट नाही, परंतु मोबाईल कल्चरमुळे परस्परातील संवाद व आपुलकी दिवसेंदिवस हरवत चालली आहे, त्यामुळे नव्याने या माध्यमाचा वापर चांगल्याप्रकारे कसा करता येऊ शकतो यावर विचार करण्याची वेळ आलेली.

ज्येष्ठांचा आदर केला जात नाही
पूर्वी ज्येष्ठांचा आदर केला जात होता. एकत्र कुटूंब पद्धती असल्याने समस्यांचे निराकरण घरातच केले जात होते. मात्र, आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात सुसंवाद राहिला नाही. व्यवसायात सुसंवादाचे महत्व पटवून देवून व्यावसायिक जीवनात आपल्याजवळ चांगल्या कल्पना असतात परंतु आपण त्या सुसंवादाद्वारे आपल्या सहकार्‍यांशी, कर्मचार्‍यांशी व्यवस्थित शेअर केल्या पाहिजेत, अन्यथा त्या केवळ कल्पना राहून जातात असे सुराणा यांनी लक्षात आणून दिले.

सुसंवादाचे प्रशिक्षणाची गरज
संवाद बंद होवून डिजीटल संवाद होत आहे. दोन पिढ्यांमध्ये संवादाचा अभाव मोठ्या समस्या निर्माण करतो. व्यवसायात सुसंवाद हे आजच्या तारखेला अत्यावश्यक झाले आहे. पाश्चिमात्य देशात तर सुसंवादाचे प्रशिक्षण व्यवसाय सुरु करण्यासाठी अत्यावश्यक मानले जाते. भारतातही व्यावसायिक जीवनात सुसंवादाचे प्रशिक्षण घेण्याची सध्या गरज त्यांनी स्पष्ट केली. सुराणा यांनी आपल्या आगळ्या शैलीने कार्यशाळा खुलवत नेली, पण उपस्थितांना त्यांची सर्वाधिक भावलेली तर्‍हा म्हणजे त्यांच्या व्याख्यानाचे संवादी स्वरूप. यावेळी सुराणांनी थेट संवाद साधला.