सुहिताच्या मदतीने ‘ती’ची सुटका!

0

मुंबई । दुबई येथे कामासाठी गेलेल्या महिलेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या प्रयत्नातून दुबईतून मस्कत येथून सुटका केली आहे. नव्यानेच सुरू झालेल्या ’सुहिता’ हेल्पलाइनच्या मदतीने मस्कतला पोहोचलेल्या फरिदा खान यांची सुटका करण्यात आली आहे. दुबई येथे नोकरी देण्याचे आमिष दाखवून फरिदा यांना काही एजंटांनी भारतातून दुबईला नेले होते. भारतातून गरजू महिलांना दुबई येथे काम मिळवून देतो म्हणून एजंट घेऊन जातात. तेथून त्या महिलांना मस्कत येथे हलवण्यात येते व तेथे त्यांचा छळ केला जातो, अशी माहिती नुकतीच भारतात परत आलेल्या फरिदा खानने दिली आहे. फरिदा या महिलेला नोकरीचे आमिष दाखवून एका एजंटने 27 जानेवारी 2018 ला दुबईला नेले होते. दुबईला पोहोचल्यावर त्यांना नोकरी देण्याऐवजी ते एजंट मस्कतला घेऊन गेले. मस्कतमध्ये गेल्यावर कुटुंबीयांशी त्यांचा संपर्क तुटला. तेथेच त्यांचा छळ करण्यात येऊ लागला होता. त्यांचा पासपोर्ट जप्त झाल्याने त्या तेथून परतण्यास असमर्थ होत्या.

यादरम्यान त्यांचे पती अब्दुल अजिज खान यांनी नुकतीच सुरू झालेल्या सुहिता हेल्पलाइनच्या मदतीने महिला आयोगाशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परराष्ट्र मंत्रालयाने त्यांची मदत केली. व त्यांना भारतात परत आणण्यात यश आले. 1 मे रोजी फरिदा खान यांना मुंबईत आणण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या औषधोपचार सुरू आहेत. महिला आयोगाच्या विजया रहाटकर त्यांनी त्यांची काल भेट घेतली. मस्कत येथे अडकलेल्या आणखीन महिलांना सोडवण्याची त्यांनी विनंती केली. सुहिता हेल्पलाइनबाबत बोलताना विजया रहाटकर म्हणाल्या की, ‘सुहिता’ (7477722424) या नव्यानेच आयोगाने सुरू केलेल्या फरिदासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आयोगाने परराष्ट्र मंत्रालयामार्फत सर्वतोपरी मदत केली आणि आज फरिदा परत आपल्या 2 मुली आणि पतीसोबत आहेत. भविष्यात अशा घटनांचा महिलांना सामना करावा लागू नये यासाठी आयोग परराष्ट्र मंत्रालयासोबत काम करणार आहे तसेच महिलांची फसवणूक करणार्‍या एजंटविरोधात ही कारवाई व्हावी यासाठी पोलिसांना सूचना देण्यात येतील, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी सांगितले.

अंबरनाथच्या बुवापाड्यात राहणार्‍या फरिदाच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्यामुळे परदेशात काही वर्षे काम करून परिस्थिती सुधारेल, या आशेने तिने एका एजंटच्या मदतीने काही महिन्यांपूर्वी दुबई गाठले. तिथून तिला ओमानमधील मस्कतला नेऊन अहमद कपिल नामक व्यक्तीच्या घरी घरकामाला ठेवण्यात आले. मात्र, 17 खोल्यांच्या अवाढव्य घराची साफसफाई, त्यातल्या 20-25 माणसांच्या जेवणापासून कपडे धुणे, भांडी घासणे, गाड्या धुणे, अशी सगळी कामे तिच्या एकटीवर टाकण्यात आली. एकट्या बाईला इतकी कामे करणे अशक्यच होते. मात्र, तरीही काही दिवस फरिदाने हे निमूटपणे सहन करत काम केले. मात्र, कामात छोटीशीही चूक झाली तरी शिवीगाळ, मारहाण, उपाशी ठेवून छळ करणे, असे प्रकार होऊ लागल्यानंतर फरिदा धास्तावली.

स्थानिक एजंटविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
या सर्व छळाला कंटाळून तिने काम सोडून भारतात परतण्याची मागणी केल्यानंतर तर तिचं तिच्या घरच्यांशी बोलणेही बंद करण्यात आले. त्यामुळे काळजीत पडलेल्या तिच्या घरच्यांनी इकडे राज्य महिला आयोग आणि परराष्ट्र खात्याकडे मदतीची याचना केली. त्याची दखल घेत ओमानमधील भारतीय उच्चायुक्तांनी फरिदाची शोधाशोध सुरू केल्यावर तिच्या मालकाने घाबरून तिची सुटका केली आणि एजंटच्या मदतीने तिला भारतात माघारी धाडले. या नंतर आता पैशांच्या हव्यासापोटी आखाती देशात कुणीही जाऊ नका, असे आवाहन फरिदा करतेय. याप्रकरणी लोकांना फसवून आखाती देशात गुलाम म्हणून पाठवणार्‍या स्थानिक एजंटविरोधात गुन्हा दाखल करण्याची तिची मागणी आहे. शिवाय आखाती देशात अशाप्रकारे अनेक भारतीय लोकांना गुलाम म्हणून डांबून ठेवल्याचेही फरिदा सांगते.