सूतगिरणीच्या उत्पादनास प्रारंभ

0

चोपडा । येथील चोपडा तालुका सहकारी सूतगिरणीच्या प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेला शुक्रवार 24 मार्च रोजी प्रकल्पाचे तात्कालीन मुख्य प्रवर्तक, माजी चेअरमन व माजी आमदार डॅा.सुरेश पाटील यांच्याहस्ते विधीवत पूजा-अर्चा करुन प्रारंभ करण्यात आला. यावेळी छोटेखानी समारंभाचे प्रास्तविक कार्यकारी संचालक मांतेश महाजन यांनी करुन प्रकल्पाची तांत्रीक माहिती सांगितली. यावेळी इंदिराताई पाटील यांना कार्यगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थितांचे स्वागत चेअरमन कैलास पाटील, व्हा.चेअरमन पी.बी.पाटील आदींनी केले. याप्रसंगी तांत्रीक सल्लागार काणे यांनी सूतगिरणीच्या निधीसाठी अल्पकाळात एन.सी.डी.सी.चे मोठे सहकार्य मिळाल्याचे सांगून देशात विशेष योजनेचा लाभ मिळविणारी चोपडा सूतगिरणी पहिलीच आहे. सचोटीने, काटकसरीने सूतगिरणी चालवून उत्तम मार्केटिंग केल्यास लवकरात लवकर प्रकल्प कर्जमुक्त होईल.

भाजप नेते घनःश्याम अग्रवाल यांनी कापूस उद्योगाच्या भरभराटीच्या काळात सूतगिरणी सुरु होत असल्याने नक्कीच प्रगती होईल असे सांगितले. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांनी तालुक्याला पडलेले स्वप्न प्रत्यक्षात अवतरत असून रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. यापूर्वी देखील सूतगिरणी उभारणीत तात्कालीन चेअरमन व संचालक मंडळानी प्रयत्न केले. पण चेअरमन कैलास पाटील यांची जिद्द व पाठपुरावा यामुळे 25 वर्षांनी प्रकल्प सुरु होत असल्याचा आनंद असल्याचे सांगितले. जेष्ठ संचालक बी.बी.पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

यांची उपस्थिती
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, भाजप नेते घनःश्याम अग्रवाल, माजी जि.प.सदस्या इंदिराताई पाटील, माजी शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र सोनवणे, सूतगिरणीचे व्हा.चेअरमन पी.बी.पाटील, संचालक प्रकाश रजाळे, बी.बी.पाटील, एस.बी.पाटील, भागवत पाटील, रामदास चौधरी, तुकाराम पाटील, अशोक पाटील, शशीकांत पाटील, भालेराव पाटील, राहुल बाविस्कर, भरत बाविस्कर, समाधान पाटील, सुनील जैन, रवींद्र पाटील, राजेंद्र पाटील, जागृती बोरसे आदी उपस्थित होते.

कमीतकमी खर्चात उभारणी – चेअरमन पाटील
सूतगिरणीला एनसीडीसीने 57 कोटींचे कर्ज मंजूर केले असले तरी प्रत्यक्षात केवळ 37 कोटींचे कर्ज उचलून 17 हजार 500 चात्यांची सूतगिरणी आपण पहिल्या टप्प्यात सुरु करत आहोत.भविष्यात निधीच्या बारकाईने प्रकल्पाचे विस्तारीकरण होत राहील.सूतगिरणीला वेळेत चालू केल्याने तेरा कोटींचे प्रोत्साहन अनुदान प्राप्त होणार आहे.राज्य शासनाचे देखील चार कोटींचे अनुदान मिळणार आहे.स्व.धोडूअप्पांनी कमी खर्चात साखर कारखाना उभारला तद्वतच आपण आचंबित करणार्‍या कमी खर्चात सूतगिरणी चालवून तालुक्याच्या विकासाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे.नजिकच्या कालावधीत सूतगिरणीत झपाट्याने विकास साधला जाईल अशी ग्वाही चेअरमन माजी आ.कैलास पाटील यांनी बोलताना दिली. यावेळी सूतगिरणीचे जुने कर्मचारी पंढरीनाथ पाटील,बन्सीलाल अप्पा यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देवेंद्र सोनवणे यांनी केले.माजी आमदार डॉ.पाटील यांनी पूजा केल्यानंतर सूतगिरणीतील सुमारे वीस प्रकारच्या यंत्राचे पुजन संचालिका रंजना नेवे व माजी संचालक श्रीकांत नेवे, संचालिका जागृती बोरसे व संजय बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले.