पुणे । 65व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात किराणा व आग्रा घराण्याचे युवा गायक तुषार दत्त यांच्या सूरबद्ध गायनाने झाली. त्यांनी राग ‘गौड सारंग’ गायला. त्यानंतर त्यांनी ‘शिवरंजनी’ रागातील रचना सादर केली. ‘दादरा’मधील ‘चार दिनों की प्रीत तुम्हारी’ आणि ‘मन भाया रे सांवरिया’ या सुश्राव्य रचनेने दत्त त्यांनी आपल्या आश्वासक सादरीकरणाचा शेवट केला. त्यांना प्रशांत पांडव (तबला), आविनाश दिघे (संवादिनी), कांचन लघाटे, मुकुंद बद्रायनी (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
उपाध्ये व सोपोरी यांच्यात रंगली जुगलबंदी
त्याच्यानंतर पं. भजन सोपोरी यांचे सुपुत्र व शिष्य अभय सोपोरी यांचे संतूर वादन श्रोत्यांच्या मनाची तार छेडून गेले. त्यांनी या मंचावरील आपल्या पहिल्या सादरीकरणासाठी राग ‘भीम’ची निवड केली. पखवाजवर साथसंगत करणार्या ऋषी शंकर उपाध्ये व सोपोरी यांच्यात रंगलेल्या जुगलबंदीने श्रोत्यांची दाद मिळवली. त्यानंतर सोपोरी यांनी ‘आलाप’ व ‘जोड’ सादर केली. त्यांनी काश्मिरी सुफियाना तराणा सादर करून आपल्या सादरीकरणाचा शेवट केला. त्यांना उस्ताद अक्रम खान यांनी तबल्याची साथसंगत केली.
बेशिस्त पार्किंगवर कारवाई का नाही?
या कार्यक्रमासाठी येणार्या नागरिकांच्या वाहनांच्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे त्या परिसरात राहणार्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून पोलीसही या याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे पुणे शहराध्यक्ष संतोष शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे केला. नागरिकांच्या गाड्या पार्क करण्याकडे ना वाहतूक पोलिसांचे लक्ष आहे ना संयोजकाचे. शिवजयंती, गणेशोत्सव, दहिहंडी, नवरात्रोत्सव यादरम्यान चुकीच्या पध्दतीने पार्किंग करणा-यांवर कारवाई करणारे पोलीस आता सवाई गंधर्वच्या बेशिस्त गाड्या पार्किंगवर कारवाई का करत नाहीतर, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. रमणबाग शाळेने विद्यार्थ्यांचे हित दुर्लक्ष करून शाळेचे वेळापत्रक बदलले. तसेच ग्राउंडवर मंडपाचे काम महिन्याभरापासून सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे पिटी व इतर क्रीडा प्रकार बंद आहेत. संस्थेचा पैसे कमवण्यासाठी हा कुठला अजब न्याय. याचा जाब विचारण्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य किरण शाळीग्राम व रमणबाग संस्थेच्या प्राचार्या रेड्डी यांना निवेदन दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
60 वाहनांना जॅमर
सवाई ऐकायला आलेल्या गानरसिकांना पुणे वाहतूक शाखेने दणका दिला आहे. वाहनांना जॅमर लावण्यात आल्याने रसिकांना मनस्ताप सहन करावा लागणार असल्याचे दिसत आहे. सवाई ऐकायला आलेले रसिक आपली वाहने महर्षी शिंदे पुलाच्या दोन्ही बाजूला लावून जात असतात. त्यामुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ही सगळी वाहने जॅमर लावून जाम केली. तब्बल 60हून अधिक वाहने पोलिसांनी अशी जाम केली. दुपारपासून गानसमाधी लावलेल्या रसिकांना याची कल्पनाच नव्हती. सवाई संपल्यावर या गायनप्रेमींना आता पोलिसांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यांच्याकडून दंडाचे गाणे ऐकल्याशिवाय पोलीस त्यांची वाहने सोडण्याची सूतराम शक्यता नाही.