‘सूरमयी शाम’मधून गीतांची बरसात

0

पुणे । ‘पाहिले न मी तुला… और इस दिल में क्या रखा हे… तुला पाहिले मी नदीच्या किनारी… सिने में जलन… मेघा रे मेघा रे…’ अशा सदाबहार हिंदी-मराठी गाण्यांची रसिकांवर बरसात झाली आणि सूरमयी शाम उपस्थितांनी प्रत्यक्ष अनुभविली. पं. सुरेश वाडकर यांनी आपल्या सुमधूर गायकीतून विविध प्रकारची गाणी सादर करून रसिकांवर स्वरांचा अक्षरश: पाऊस पाडला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. सूरमयी शाम या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, पु. ना. गाडगीळ अ‍ॅन्ड सन्सचे पराग गाडगीळ, सौरभ गाडगीळ, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सर्वांच्या लोकप्रिय ओंकार स्वरुपा… या गणेश वंदनेने झाली. यानंतर चांदनी चित्रपटातील लगी आज सावन की फिर वो झडी हे… या गीतांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. तुम जो मिल गए हो… तुमसे मिलके… या गीतांना रसिकांनी दाद दिली. पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले दयाघना का तुटले… या गीताच्या सादरीकरणाने रसिक भावुक झाले. सत्यजीत प्रभु (सिंथेसायझर),आर्चिस लेले (तबला),वरद कथापूरकर (बासरी), सुरेश अय्यर (गिटार) योगेश प्रधान (संगीत संयोजन)आणि इतर कलाकार यांनी साथसंगत केली. प्रकाश पायगुडे यांनी कर्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.