दोंडाईचा । दोंडाईचा शहरात लग्न सराईची धूम असून उलाढाल होतांना दिसत आहे. दोंडाईचा शहर धुळे जिल्ह्यातील मोठे शहर असून येथे मिरचीची मोठी बाजारपेठ आहे. लग्नासाठी सोने, कापड, भांडी खरेदी करण्यासाठी शिंदखेडा, खेतिया, साक्री, शिरपूर, शहादा व परिसरातील 120 खेड्यातील लोक येथे बाजारपेठेत येत असतात. यामुळे व्यावसायिकांची चलती दिसून येत आहे. उन्हाळयाची तीव्रता वाढत असून सुर्यदेव आग ओकत असल्याने थंडपेय विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
उसाच्या ताज्या रसावर ग्राहकांचा भर
लस्सी, आंब्याचा रस, कोल्ड्रींक्स व खास करुन उसाच्या ताजा रसावर ग्राहकांची गर्दी दिसत आहे. शहरातील जनतेने उसाच्या रसाला जास्त प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. यावर्षी प्रथमच राजस्थानी लोकांनी देखील या व्यवसायात उडी घेतली आहे. राजस्थानातील भिलवाडा येथून उसाच्या फिरत्या लॉर्या दोंडाईचा शहरात आल्या असून ठिकठिकाणी गर्दीच्या ठिकाणी उसाच्या रसाची विक्री होत आहे. जवळपास दहा ते बारा रसवंत्या आल्याने स्थानिक दुकानदारांमध्ये धंद्यावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. लिंबू, अद्रकमिश्रीत उसाच्या रसाला प्रती ग्लास दहा रुपयाप्रमाणे विक्री होत आहे. यावर्षी उसाला भाव जास्त असल्याचे मुडी येथील व्यापारी रघु महाजन यांनी सांगितले. सुरुवातीला 6 हजार रुपये प्रती टन उसाची विक्री केली होती. परंतू नंदुरबार व धुळे जिल्ह्यात ऊस पुरविण्याची जबाबदारी असल्याने आता नाशिक येथून ऊस मागविण्यात येत आहे. त्यामुळे जवळपास साडे सात ते आठ हजार रुपये प्रती टन उस विक्री होत आहे.