सूर्यवंशी बंधूंची न्यायालयीन कोठडीत रवानगी

भुसावळ : व्याजाने दिलेल्या पैशांच्या कारणावरून झालेल्या वादानंतर रीपाइंचे जळगाव जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी आणि त्यांचे भाऊ अनंत सूर्यवंशी यांनी बंदुकीच्या धाकावर धमकावत एक लाख 60 हजारांचे दागिने हिसकावल्याचा आरोप तक्रारदाराने केल्याने वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघा बंधूंना 12 रोजी रात्री अटक करण्यात आल्यानंतर सुरूवातीला 16 व नंतर 18 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. गुरुवारी पुन्हा संशयीत आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिस व सरकार पक्षाने पोलिस कोठडीची मागणी केली तर संशयीत आरोपींच्या वकीलाने हरकत नोंदवली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, संशयीत आरोपींतर्फे जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून 22 पर्यंत न्यायालयाने पोलिसांना से देण्यास सांगितला आहे. संशयित आरोपीतर्फे अ‍ॅड.जगदीश कापडे व अ‍ॅड.चरणजीत सिंग यांनी बाजू मांडली तर पोलिसांतर्फे सहा.निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी बाजू मांडली.