भुसावळ : व्याजाने दिलेल्या पैशांच्या कारणावरून झालेल्या वादानंतर रीपाइंचे जळगाव जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी आणि त्यांचे भाऊ अनंत सूर्यवंशी यांनी बंदुकीच्या धाकावर धमकावत एक लाख 60 हजारांचे दागिने हिसकावल्याचा आरोप तक्रारदाराने केल्याने वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर शुक्रवार 12 रोजी रात्री पोलिसांनी कोम्बिंग करीत दोघा बंधूंना अटक करण्यात आली होती व न्यायालयाने त्यांना 16 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी पुन्हा भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्या.मानकर यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी
संजय खन्ना (रा.साईनगर, दर्यापूर शिवार वरणगाव फॅक्टरी) यांच्या फिर्यादीनुसार, 5 मार्चला दुपारी राजू सूर्यवंशी आणि त्यांचे भाऊ अनंत सूर्यवंशी (दोघे रा.15 बंगला, भुसावळ) हे त्यांचे दोन बॉडीगार्ड घेऊन घरी आले. यावेळी राजू सूर्यवंशीने डाव्या बरगडीला पिस्तूल लावली, तर अनंत सूर्यवंशीने शिवीगाळ करत, पैसे परत न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर दोघांनी खन्ना यांच्या पत्नीच्या अंगावरील एक लाख 60 हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यात सूर्यवंशी बंधूंना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना सुरूवातीला 16 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मंगळवारी कोठडीची मुदत संपल्याने न्या.मानकर यांच्या न्यायासनापुढे त्यांना हजर केले असता पुन्हा दोन दिवसांची पोलिसांची कोठडी सुनावण्यात आली. संशयीत आरोपी पोलिसांच्या तपासात सहकार्य करीत नाहीत शिवाय गुन्ह्यात वापरलेली बंदुक व लांबवलेले दागिने अद्याप जप्त करावयाचे असल्याचा युक्तीवाद सरकारील वकील अॅड.आर.एम.गवई व सहा.निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी केला. संशयीत आरोपीतर्फे अॅड.जगदीश कापडे व अॅड.चरणजीत सिंग यांनी बाजू मांडली.