जळगाव । शहरातील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या पंधराव्या वर्धांपन दिनानिमित्त देण्यात येणारे 2017 चे सूर्योदय वाड्ःमय पुरस्कार अध्यक्ष सतीश जैन यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे जाहीर केले आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना श्री. दलुभाई जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित दुसर्या वर्षांचे पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन सूर्योदय साहित्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. लेखक भारत सासणे यांना आठव्या वर्षांचा अखिल भारतीय श्री. दलुभाऊ जैन मराठी साहित्य भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून श्री. दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन यांच्या स्मरणार्थ बाराव्या वर्षांचा सूर्योदय सेवा पुरस्कार नामवंत लेखिका विनीता ऐनपुरे यांना तर स्व. बन्सिलाल शिवराज हस्तीमल जैन, स्व. कांतीलाल हिरालाल चोरडीया यांच्या स्मरणार्थ प्रथम वर्षांचा सूर्योदय साहित्य भूषण पुरस्कार लेखिका डॉ. विजया वाड यांना जाहीर करण्यात आलेला आहे.
यांच्या स्मरणार्थ दिला जाणार साहित्य पुरस्कार
स्व. प्रा. पन्नालाल भंडारी, स्व. सौ. बदामबाई हेमराज देसर्डांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पंधाराव्या वर्षांचा सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार लेखक सुबोध जावडेकर यांना तर स्व. इंदरचंद श्रीमती रामकुंवरबाई देसर्डांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पंधाराव्या वर्षांचा सूर्योदय अक्षररत्न पुरस्कार गझलकार प्रदीप निफाडकर यांना जाहीर करण्यात आलेला आहे. लेखिका नीलम माणगावे (जयसिंगपूर, कोल्हापूर) यांना सौ. लिलाबाई दलिचंद जैन सूर्योदय बालवाड्ःमय पुरस्कार तिसर्या वर्षांचा जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार युवा लेखक ऐश्वर्य पाटेकर (काकासाहेबनगर, नाशिक) यांना स्व. गोकुळचंद्र लाहोटींच्या स्मरणार्थ चौथ्या वर्षांचा सूर्योदय सेवाव्रती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, वसंत आबाजी डहाके, गिरिजा कीर, प्रभा गणोरकर, प्रा. भास्कर गिरिधारी, डॉ. तारा भवाळकर, प्रा. विश्वास वसेकर, डॉ. अनुपमा उजगरे, रेखा बैजल, आसावरी काकडे, माया धुप्पड, डॉ. उल्हास कडूसकर, एकनाथ आव्हाड, सुभाषचंद्र वैष्णव, दिनेश दगडकर, डॉ. ज्ञानेश पाटील, मेधा उज्जैनकर, प्रा. चारूता गोखले यांनी पुरस्कार्थींची निवड केलेली आहे.