अलिबाग – मासिक पाळीच्या काळात मुली शाळेत गैरहजर राहतात. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन तर्फे विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. तीन टप्प्यात राबवल्या जाणार्या या उपक्रमात मासिक पाळी विषयीचे गैरसमज दूर करण्यात येतील. तसेच सॅनिटरी नॅपकिनचा वापर तसेच ते नष्ट करण्याचा मशीन शाळांमध्ये उपलब्ध करण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. मासिक पाळी येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून कोणत्याही प्रकारचा आजार नाही. याबाबत आजही समाजात अंधश्रद्धा म्हणून पहिले जाते. या काळात मुलीची शाळेतील हजेरी दर महिन्याला कमी भरलेली असते. कारण शाळेत मासिक पाळी वेळी लागणारे सॅनिटरी नॅपकिनची सुविधा नसते. ते बदलण्यासाठी चेंजिग रूम नसते. सॅनिटरी नॅपकिन नष्ट करण्याची सुविधा शाळेमार्फत केलेली नसते. त्यामुळे याकाळात मुलीची शाळेतील गळती मोठ्या प्रमाणात असते. त्याचबरोबर मुलीच्या आरोग्य, जननेंद्रीय, गर्भाशय यावर वितरित परिणाम होण्याची शक्यता असते.
जिल्ह्यात 1 लाख 36 हजार 916 किशोरवयीन मुली
रायगड जिल्ह्यात 613 माध्यमिक शाळा असून 6 ते 12 वयोगट असलेल्या 1 लाख 36 हजार 916 किशोरवयीन मुली शिक्षण घेत आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने किशोरवयीन मुलीच्या या समस्येवर उपाय करण्यासाठी सॅनिटरी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम हाती घेतला आहे. हा कार्यक्रम तीन टप्यात राबविणार असून पहिल्या टप्यात मास्टर ट्रेनर तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये माध्यमिक शिक्षिका, आयसीडीएफएल, महिला आरोग्य सेविका, केंद्रप्रमुख, पालक याना याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दुसर्या टप्यात शाळांमध्ये किशोरवयीन मुलींना मासिक पाळी विषयाची माहिती दिली जाणार आहे. यासाठी गावपातळीवर संवादक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, एनजीओ, बचत गट याची मदत घेण्यात येणार आहे. तिसर्या टप्यात शाळेतील मुख्यध्यापक, संस्थाचालक याना मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमात सामावून घेऊन सॅनिटरी नॅपकिन व नष्ट करण्यासाठी लागणार्या मशिनीबाबत माहिती देऊन हा उपक्रम आपल्या शाळांमध्ये राबविण्यास सांगण्यात येणार आहे.
महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत चालढकल
शासनाच्या 14 व्या वित्त आयोगानुसार ग्रामपंचायतीने आरोग्य व शिक्षण, उपजीविका यासाठी निधी देणे गरजेचे असते. त्यासाठी शासनाकडून निधी आलेला असतो त्यातील 25% निधी हा आरोग्य व शिक्षण यासाठी खर्च करायाचा असतो. या निधीतूनही मुलीच्या आरोग्याशी निगडित असलेल्या मासिक पाळीच्या काळात लागणार्या सॅनिटरी नॅपकिन साठीचा खर्च करू शकतात. मात्र एकीकडे महिला सबलीकरणाचा नारा करायचा आणि महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत चालढकल करायची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. किशोरवयीन मुली ह्या भविष्यातील माता होणार असल्याने आतापासून त्याची आरोग्याची काळजी घेतली तर भविष्यात होणार्या अडचणी पासून त्या निरोगी राहतील.
निधी उपलब्ध करणे गरजेचे
शिक्षण विभागानेही किशोरवयीन मुलीच्या या समस्येवर लक्ष देऊन त्यांनीही सॅनिटरी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणे गरजेचे आहे. सॅनिटरी नॅपकिन व ते नष्ट करण्यासाठी लागणार्या मशिनीसाठी एनजीओ, कंपनी यांना हाताशी धरून हा कार्यक्रम रायगड जिल्ह्यात यशस्वी करणार असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले आहे. सॅनिटरी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमबाबत जिल्हा परिषद सदस्य यांनीही लक्ष घालून यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.