सॅनिटरी नॅपकीन व्हेंडींग मशीनचे हस्तांतरण

0

विद्यार्थिनींसाठी इन्सिनरेशन मशिनचीही सोय

पिंपरी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत व्यावसायिक व सामाजिक बांधिलकीचे माध्यमातुन एक्साईड इंडस्ट्रीजच्यावतीने विदयार्थिनींकरिता सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग व डिस्ट्रॉय मशीनचे महानगरपालिकेस प्रातिनिधीक स्वरुपात हस्तांतरण शुक्रवारी करण्यात आले. सॅनिटरी नॅपकिन सहज उपलब्ध व्हावे यासाठी महानगरपालिकेच्या 9 माध्यमिक शाळांमध्ये वेडींग मशीन व वापरलेल्या नॅपकीनची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी इन्सीनरेशन मशिन बसविण्यात आले आहे. विद्यार्थिनींना सहज नॅपकीन मिळावे यासाठी या मशिन बसविण्यात आल्या आहेत.

पिंपळेगुरव, थेरगावमध्ये मशीन
आकुर्डी, काळभोरनगर, रूपीनगर, श्रमीकनगर निगडी येथील माध्यमिक शाळांमध्ये हे मशीन बसविण्यात आले आहे. पिंपळेगुरव, थेरगांव, क्रिडा प्रबोधिनी, केशवनगर व पिंपळे सौदागर येथे या वर्षात कंपनीच्यावतीने सीएसआर अंतर्गत सॅनिटरी नॅपकिन वेंडींग मशीन बसविण्यात आले आहे. व्हेन्डींग मशीनमध्ये 5 रु.चे नाणे टाकल्यानंतर एक सॅनीटरी नॅपकिन मिळते. तसेच वापर केलेले सॅनिटरी नॅपकिन इन्सीनरेशन मशीनमध्ये टाकलेनंतर ते साधारण 15 मिनिटांमध्ये शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट होऊन त्याची राख ऍश ट्रे मध्ये राहते तसेच मशिनला असुन धुर जाण्यासाठी आऊटलेट काढण्यात आले आहे.

या कार्यक्रमास उपमहापौर शैलजा मोरे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, नगरसदस्या उषा मुंढे, चंदा लोखंडे, नगरसदस्य सागर आंघोळकर, तसेच एक्साईड इंडस्ट लिमिटेड कंपनीचे मुख्य अधिकारी के. अनिरुध्द, एस. श्रीधरन, डेप्युटी मॅनेजर कुमारी निमा गिध तसेच सह आयुक्त दिलीप गावडे, क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे, शाळेचे मुख्याध्यापक वडगणे एस.डी, सहा. आरोग्याधिकारी व्हि. के. बेंडाळे, मुख्य आरोग्य निरीक्षक अजय जाधव व आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई उपस्थित होते.

याप्रसंगी उपमहापौर शैलजा मोरे, सुनिता तापकीर, उषा मुंढे, दिलीप गावडे यांनी उपस्थित विदयार्थीनिंना मार्गदर्शन केले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांसाठी सी.एस.आर. अंतर्गत उदयोजक, व्यापारी, कार्पोरेट कंपनी, सेवाभावी संस्था यांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.