सॅबेस्टीयन विटल विजयी

0

बुडापेस्ट । फेरारीचा जर्मन चालक सॅबेस्टीयन वेटलने हंगेरी ग्रापी फॉर्म्युला वन शर्यत जिंकली आहे. या विजेतेपदासह वेटेलने जागतिक अजिंक्यपदाच्या शर्यतीत आपली बाजू आणखी भक्कम केली आहे. रविवारी झालेल्या शर्यतीत वेटलने सुरूवातीपासूनच आघाडी घेत आपला संघसहकारी फिनलंडचा चालक किमी रायकोनेनला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले.

मर्सिडीझचा वॉल्टेरी बोटास तिसर्‍या स्थानावर राहिला. या विजयामुळे वेटलच्या खात्यात आता 25 गुण जमा झाले असून त्याचे आता 202 गुण झाले आहेत. दुसर्‍या क्रमांकावर मर्सिडीझ संघाचा लुईस हॅमिल्टन (188) आणि तिसर्‍या क्रमांकावर मर्सिडीझचा वॉल्टेरी बोटास (169) आहे. वेटलचे हे फॉर्म्युला वन ग्रापीमधील 46 वे विजेतेपद आहे. अन्य चालकांमध्ये मर्सिडीझचा हॅमिल्टन चौथ्या स्थानावर राहिला. रेड बुल संघातील नेदरलॅड्सचा चालक मॅक्स वर्सटॉपेन पाचव्या आणि मॅक्लेरन संघाचा स्पॅनीश चालक फर्नांडो अलांसो सहाव्या स्थानावर राहिला. टोरो रॉसो संघातील कार्लोस सँज सातव्या स्थानावर राहिला.

सहारा फोर्स इंडियानेही या शर्यतीतून दुहेरी गुण मिळवले. त्यांचे चालक सर्जियो पेरेझ आणि अ‍ॅस्तेबान ओकोन अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानावर राहिले. या कामगिरीमुळे सहारा फोर्स इंडियाला सहा गुण मिळवले. सांघिक अजिंक्यपदाच्या शर्यतीत सहारा फोर्स इंडियाने 101 गुणांसह चौथ्या स्थान मिळवत आपली बाजू भक्कम केली आहे.