नवी दिल्ली – सॅमसंग जगातील सर्वात मोठे मोबाईल उत्पादन युनिट नोएडा येथे सुरू करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व दक्षिण कोरियाचे पंतप्रधान मून जेई इन आज सेक्टर ८१ मध्ये या फॅक्टरीचे उद्घाटन करणार आहेत. याबरोबरच नोएडाचे नाव मोबाईल निर्मिती करणाऱ्या शहरांमध्ये सर्वात अव्वल नंबरवरती येईल. चीन व अमेरिकेतील शहरेही नोएडाच्या मागे राहतील. ३५ एकरात निर्माण होणाऱ्या सॅमसंग फॅक्टरीमध्ये ७० हजार लोकांना रोजगार मिळेल.
दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे-इन भारताच्या चार दिवसीय दौऱ्यासाठी रविवारी नई दिल्लीत दाखल झाले. १९९० मध्ये सॅमसंगने देशात आपले पहिले युनिट स्थापन केले होते. सॅमसंगची नवीन फॅक्टरी त्यांच्या १९९७ मध्ये स्थापन केलेल्या युनिटच्या जवळच स्थापण केली जाईल. मागील वर्षी जूनमध्ये कंपनीने ४९१५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. या युनिटमुळे कंपनीचे उत्पादन दुप्पट होईल. सॅमसंग सध्या ६.७० कोटी स्मार्टफोन भारतात निर्माण करते. नवीन युनिट सुरू होताच ही क्षमता १२ कोटी फोन प्रतिवर्ष इतकी होईल.
नवीन प्लांट सुरू होताच मोबाईलबरोबरच रेफ्रिजरेटर व फ्लॅट पॅनल टीव्ही उत्पादनाची क्षमता वाढेल. यामुळे कंपनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करेल. सॅमसंग कंपनीचे भारतात नोएडा व तमिलनाडुच्या श्रीपेरुम्बुदुर येथे दोन प्लांट आहेत. त्याचबरोबर नोएडामध्ये एक डिझाइन सेंटरव पाच रिसर्च व डेव्हलपमेंट सेंटर आहेत. यामध्ये जवळपास ७० हजार लोक काम करतात. त्याचबरोबर कंपनीची दीड लाख रिटेल दुकाने आहेत.