भुसावळ । रेल्वेतील सेफ्टी कामगारांचे ग्रॉस पे 4 हजार 200 च्या वर आहे असे कामगार कार्यालयीन कर्मचारी बनू शकत नाही तसेच ते नॉन सेफ्टी पदावर कार्यरत राहू शकत नाहीत अशा प्रकारचे आदेश शासनाने दिले आहेत. यामुळे आता अशा कर्मचार्यांची मोठी पंचाईत होणार असल्यामुळे शासनाच्या या निर्णयाविरोधात सेट्रल रेल्वे मजदूर युनियनतर्फे डिआरएम कार्यालयावर सायंकाळी 5 वाजता मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त कर्मचार्यांनी शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने व जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून निघाला. यानंतर संघटनेतर्फे डिआरएम सुधीरकुमार गुप्ता यांना आपल्या मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.
कर्मचार्यांमध्ये तीव्र संताप
रेल्वे मंत्रालयातर्फे निर्णय जाहीर झाल्यानंतर संबंधित कर्मचार्यांंमध्ये याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असून सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनतर्फे याचा निषेध करण्यासंदर्भात तातडीची बैठक घेण्यात येऊन डिआरएम कार्यालयावर मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले यानुसार सेफ्टी कामगार श्रेणीतील कर्मचार्यांनी या मोर्चात सहभागी होऊन डिआरएम कार्यालयासमोर मोर्चा येऊन धडकला.
प्रवेशद्वारावर अडविले
याप्रसंगी रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचार्यांनी मोर्चेकर्यांना प्रवेशद्वारावरच अडविले असता मोर्चेकर्यांची याप्रसंगी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यांचा होता सहभाग
यानंतर डिआरएम सुधीरकुमार गुप्ता यांची परवानगी मिळताच मोर्चा आत सोडण्यात आला. यावेळी संघटनेच्या पदाधिकार्यांनी उपस्थित कर्मचार्यांना मार्गदर्शन केले. व आपल्या मागण्यासंदर्भात डिआरएम गुप्ता यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी व्हि.के.समाधिया, एस.बी. पाटील, नारखेडे, तोरणसिंग, किशोर उपाध्याय, बी.के. धकाडे, दिपक शर्मा, एस.एच. चौधरी, सी.के. गुप्ता, ए.के. तिवारी आदी सहभागी झाले होते.