पिंपरी-चिंचवड : सहाव्या कै. हुसेन अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत सेंट्रल रेल्वे (पुणे विभाग) संघाने बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुप, खडकी संघाचा 2-1 असा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. कै. हुसेन नाबी शेख हॉकी अॅण्ड स्पोर्टस् फाउंडेशनच्या वतीने आयोजित स्पर्धेत सेंट्रल रेल्वे संघाने 0-1 अशा पिछाडीवरून जिगरबाज खेळी करून विजेतेपद मिळवले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ऑलिम्पिक हॉकीपटू धनराज पिल्ले, सुरय्या हुसेन शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशाल वाकडकर, अमित देवकर, अजित कार्ला, विभाकर तेलोरे, सादिक शेख, अमित खराडे, रोहन जवळे, नितीन शहा उपस्थित होते.
विविध पारितोषिकांचे वितरण
विजेत्या सेंट्रल रेल्वे संघाला 21 हजार रुपये तर उपविजेत्या बीईजी संघाला 11 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. स्पर्धेतील सर्वोकृष्ट खेळाडूचा मान युवराज वाल्मिकी, सर्वोकृष्ट गोलरक्षक अवधूत सोलणकर, सर्वोकृष्ट रक्षक कांचन राजबीर, सर्वोकृष्ट हाफ राहुल शिंदे, सर्वोकृष्ट फॉवर्ड संजय टोप्पो, सर्वोकृष्ट संघ स्पोर्टस् अॅथॉरिटी ऑफ गुजरात अशी पारितोषिकेदेखील देण्यात आली. यासह किरण खैराळे आणि सिकंदर जाफर यांना लाईफ टाईम अॅचिव्हमेंट पुरस्कारदेखील देण्यात आला.