मुंबई । कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या नावाखाली सेंट जॉर्जेस रुग्णालयातील एका कामगार संघटनेने बुधवारी ऐन गर्दीच्या वेळेत शेकडो रुग्णांना वेठीस धरत दोन तास संप घडवून आणला. मात्र, प्रशासनाच्या सावधगिरीमुळे सर्व डॉक्टर कामावर असल्याने कोणत्याही प्रकारची रुग्णांची गैरसोय झाली नाही. प्रशासनासोबत चर्चा करून आपले प्रश्न सोडवण्याऐवजी संघटनेतील अनेक पदाधिकार्यांना डावलून ऐन गर्दीच्या वेळात आणि सर्व ओपीडी सुरू असताना दोन तासांचा संप कामगार संघटनेने पुकारला होता. या संपामुळे शेकडो रुग्णांना कामगार संघटनेने वेठीस धरले होते. यामुळे अनेक रुग्णांना उपचार मिळू शकला नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी सेंट जॉर्जेस रुग्णालय समूहाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. एस. डी. नंदकनर व अधिष्ठाता डॉ. मधुकर गायकवाड यांच्या पुढाकारामुळे संप सुरू होण्याच्या पूर्वीच सकाळी 9 वाजता संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करून संप मिटवण्यासाठी बैठक बोलावली होती. बहुतांश मागण्यांवर यापूर्वीच सकारात्मक चर्चा झाली होती. मात्र, त्यावर समाधान न झाल्याने बैठक लांबवत कर्मचारी संघटनेने संप सुरूच ठेवला. तब्बल दीड तास झालेल्या बैठकीत प्रशासनाकडून सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला. त्यानंतर कामगार संघटनेने दोन तासांचा बंद केल्यानंतर तो मागे घेतला.
सेंट जॉर्जेस रुग्णालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विठोबा पाडावी आणि त्यांच्या काही सहकार्यांनी हा दोन तासांचा संप पुकारला होता. या संपाला संघटनेच्या अनेक पदाधिकार्यांनी विरोध दर्शवला होता. यात संघटनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी रजेवर आणि गावी गेल्याने घटनास्थळी हजर नव्हते. रिक्त पदांवर तत्काळ बदली कामगारांची नियुक्ती करावी ही संपकर्यांची महत्त्वाची मागणी होती.
रुग्णालय परिसरात राज्य सुरक्षा बलाच्या कर्मचार्यांच्या वाढविण्यात आलेल्या सुरक्षा यंत्रणेवर आक्षेप घेणे, सेंट जॉर्जेसच्या कर्मचार्यांना कोणत्याही सुरक्षा बलाच्या पोलीस अथवा इतरांनी विचारणा करत अडवू नये, परिसरातील वृक्ष धोकादायक झाली असून ती संतुलित करावी, परिसरात बांधण्यात आलेल्या श्रद्धा व समृद्धी या दोन्ही इमारतींच्या हस्तांतराचा प्रश्न तत्काळ सोडवावा, प्रत्येक कक्षातील गॅस सिलिंडर व्यवस्था कार्यान्वित करावी, ग्रंथालयात असलेले रिक्त पद, वर्ग-पदस्थापनेची कार्यवाही करावी आदी मागण्याही कामगार संघटनेकडून करण्यात आल्या होत्या.