पनवेल । नवीन पनवेल मधील सेंट जोसेफ शाळेची अवैध फी वाढ, विद्यार्थ्यांना दिला जाणारा मानसिक त्रास आणि मनमानी कारभार याविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी, 14 सप्टेंबर रोजी शाळेवर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये पालकांसोबत महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सदस्य बाळासाहेब पाटील, नगरसेवक विक्रांत पाटील, नगरसेविका दर्शना भोईर आदी सहभागी होणार आहेत. विविध कारणे सांगून पैसे उकळण्याचे काम प्रशासन करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
दरवर्षी नियमबाह्य प्रवेश फी
दरवर्षी नियमबाह्य प्रवेश फी आकारली जात असून वेळेवर फी न भरलेल्या मुलांमध्ये दुजाभाव केल्याचे प्रकार होत आहेत. कोणी पालकांनी जर आपली कौटुंबिक स्थिती चांगली नसल्याचे सांगून फी कमी करा किंवा उशिरा देतो असे सांगितले, तर प्रिन्सिपल यांनी अपमानास्प शब्द उद्गारल्याच्या तक्रारी पालक वर्गातून आल्या आहेत.
फी वाढीसंबंधी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण शुल्क समितीचा निर्णय येईपर्यंत फी वसुलीचा तगादा लावू नये असे शासनाचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. मात्र शाळा व्यवस्थापनाने आपला हेका कायम ठेवल्यामुळे पालक विरुद्ध शाळा व्यवस्थापन असा संघर्ष उभा राहिला आहे. एबीव्हीपीनेसुद्धा याप्रकरणी मध्यस्ती केली होती. आमदार ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चाचे आयोजन केले आहे.