पर्यावरण संवर्धन समितीने घेतला पुढाकार
पिंपरी-चिंचवड : पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणार्या पर्यावरण संवर्धन समितीच्या पुढाकाराने खडकी, पुणे येथील सेंट जोसेफ स्कूल (मुलींची) येथे विद्यार्थी पर्यावरण समितीची स्थापना करण्यात आली. 11 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला. या स्कूलमधील शिक्षक व विद्यार्थ्यांकडून पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले जातात. याची दखल पर्यावरण संवर्धन समितीने घेतली.
इको क्लबचे सांगितले महत्त्व
विद्यार्थी पर्यावरण समितीची स्कूलमध्ये स्थापना झाल्यानंतर विनिता दाते यांनी विद्यार्थ्यांना इको क्लबचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर पर्यावरणपूरक साहित्याचे वाटप करण्यात आले. पर्यावरणपूरक सवयी, पर्यावरण रक्षण याबाबत प्रबोधन करण्यात आले. ई वेस्ट किती घातक आहे, याची माहिती देण्यात आली. याप्रसंगी समितीचे संस्थापक अध्यक्ष विकास पाटील यांनीही मार्गदर्शन केले. ज्या शाळांना पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी त्वरित पर्यावरण संवर्धन समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी विकास पाटील यांनी केले.