पुणे । चाळीस वर्षांनी भेटलेल्या एका हायस्कूलच्या 62 माजी विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील शाळेसाठी 10 लाख रुपये उभे करून त्या निधीतून शौचालय व वाचनालयाची भेट दिली.
‘सेंट व्हिन्सेंट हायस्कूल’च्या माजी विद्यार्थी प्रशांत चव्हाण आणि त्यांचे पिता प्रकाश चव्हाण यांनी मिरज तालुक्यातील सोनी येथे ‘क्रांतीवीर दत्ताजीराव पाटील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय’ सुरू केले आहे. येथे 1100 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या माजी विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येऊन शैक्षणिक क्षेत्रातील समाजसेवेचा आदर्श घालून देताना आपल्याच सहाध्यायाच्या ग्रामीण भागातील शैक्षणिक कार्याला आवश्यक गोष्टींची जोड दिली आहे.
माजी विद्यार्थी तनवीर इनामदार यांनी सांगितले की, 12 जूनला आम्ही माजी विद्यार्थ्यांनी आवाहन केले आणि 45 दिवसांत 10 लाख रुपये उभे राहिले. त्यातून विद्यार्थीनींसाठी शौचालय आणि सर्वांसाठी वाचनालय उभारण्यात आले. या विद्यालयाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने ही भेट देण्यात आली असे स्वप्नील पारख, सौरभ वर्मा, प्रशांत ताम्हणकर, योगेश माडीवाले, बिजॉय जोसेफ, रोनाल्ड डिसिल्व्हा, अजय ओक यांनी सांगितले.
40 वर्षांनी आले एकत्र
हे सर्व माजी विद्यार्थी 10वीपर्यंत एकत्र शिकत होेते. 40 वर्षांनी माजी विद्यार्थी मेळाव्यात भेटल्यावर त्यांनी हे संस्मरणीय काम केले. पुढील दोन वर्षांत पाटील विद्यालयाला 20 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर तीन वर्षांत 15 लाखांची मदत करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.