पुणे । जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सिंचन वाढविण्याबरोबरच संबंधितांनी शेतकर्यांच्या बांधावर रासायनिक खतांचा पुरवठा करावा. त्याचप्रमाणे सेंद्रीय खतांचा वापर करण्याबाबत प्रोत्साहन द्यावे, त्यासाठी आवश्यक निधीची तरतुद करावी, अशा सुचना जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या. विधान भवन येथे खरीप हंगाम 2018 आढावा व जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठक बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. बैठकीस आमदार भीमराव तापकीर, संजय भेगडे, सुरेश गोरे, राहुल कूल, जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक विजयकुमार इंगळे आदी उपस्थित होते.
1 हजार 989 शेततळ्यांचे काम पूर्ण
रासायनिक खत विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण या कार्यपध्दतीने जिल्ह्यातील 932 किरकोळ विक्रेत्यांकडे पी.ओ.एस. मशीन कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकार्यांनी बैठकीत दिली. त्यावर या सर्व विक्रेत्यांवर अधिकार्यांनी लक्ष ठेवून शेतकर्यांना खत पुरवठा होईल याची खबरदारी घ्यावी,अशा सुचना बापट यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या. त्याचप्रमाणे रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खतांच्या वापर वाढण्यासाठी देखील प्रोत्साहन देऊन योग्य पद्धतीने नियोजन करावे. तसेच मागेल त्याला शेततळे या अंतर्गत 2016 ते 2018 या कालावधीत एकूण 1989 शेततळे पूर्ण झालेली आहेत. मात्र,अजूनही 68 शेततळ्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. तसेच पुढील वर्षात अडीच हजार शेततळ्यांचे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
प्रलंबित कामे पूर्ण करावीत
सन 2017- 18या वर्षात पुणे ग्रामीण मंडळ अंतर्गत 1296 कृषी पंप वीज जोडण्या दिल्या असून प्रलंबित वीज जोडणीसाठी 29 हजार 421 कोटी रक्कमेचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. प्रलंबित कृषी पंपांना वीज जोडणी देण्यासाठी पुरेशा क्षमतेने कार्यवाही करावी, अशा सूचना यावेळी संबंधित अधिकार्यांना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजेनेस पात्र झालेल्या शेतकर्यांना तत्काळ लाभ देण्याचे आदेश संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीला बापट यांनी दिले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांचा आढावा बापट यांनी घेतला. मागील प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी तसेच या वर्षातील कामे सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. विविध विभागांचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी देखील समन्वय राखून प्रलंबित कामे पूर्ण करावीत, अशा सुचना देण्यात आल्या. यंदा जलयुक्त शिवार योजनेतील गावांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सर्वांनी त्यात लक्षपूर्वक काम करावे, असे आदेशही बापट यांनी दिले.