नवी दिल्ली | दुसरे घर खरेदी करणार्यांना करात वर्षाला दोन लाख रुपयांची सूट देण्याचा प्रस्ताव मागे घेण्यास सरकारने ठामपणे नकार दिला आहे. केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी हा प्रस्ताव मागे घेणार नाही, असे सांगितले. दुसर्या घरासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजात दोन लाखांची करसवलत देण्याचा प्रश्नच नाही. जे दुसरे घर घेऊ शकतात, ते करही भरू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
पहिल्यांदा घर खरेदी करणार्यांनाच करसवलत
सरकारने वित्त विधेयक 2017 नुसार, दुसरे घर खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजात करसवलत न देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तो सरकार मागे घेणार असल्याचे वृत्त होते. ते महसूल सचिव अधिया यांनी फेटाळून लावले आहे. दुसरे घर खरेदी करणार्यांच्या कर्जावरील व्याजदरात सूट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दुसर्या घरासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजदरात मिळालेल्या सवलतीचा अनेकदा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे, असेही त्यांनी सांगितले. पहिल्यांदाच घर खरेदी करणार्यांना करसवलत देण्यास प्राधान्य मिळायला हवे. याउलट दुसरे घर घेणार्यांना अशा प्रकारची करसवलत देणे योग्य नाही. दुसरे घर खरेदी करून त्याद्वारे उत्पन्न मिळवणार्यांना सूट देणे योग्य नाही, असेही अधिया यांनी यावेळी सांगितले.
कर्जावरील व्याजात सवलत मिळणार नाही
सध्याच्या नियमानुसार, घरमालक भाड्याने दिलेल्या घरावर अथवा मालमत्तेवरील व्याजावर पूर्ण कपातीचा दावा सांगू शकतात. तर आपल्या राहत्या घरावरील कर्जाच्या व्याजदरामुळे ते दोन लाखापर्यंतची करसवलत घेऊ शकतात. मात्र, अलिकडेच अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या प्रस्तावात घर भाड्याने दिले तरी, मालक केवळ दोन लाखापर्यंतच्या करसवलतीसाठीच दावा करू शकतो. त्यामुळे दुसर्या घराच्या कर्जावरील व्याजात करसवलत मिळवण्यासाठी आता ते अर्ज करू शकणार नाहीत.